कृष्णा नदी प्रदूषणमुक्तीसाठी फोरमचा निर्णय

By admin | Published: January 10, 2016 10:50 PM2016-01-10T22:50:12+5:302016-01-11T00:50:19+5:30

वाईत बैठक : चर्चेनंतर पक्षविरहित स्वच्छतेचे काम करण्यावर शिक्कामोर्तब

Forum decision for emancipation of Krishna river pollution | कृष्णा नदी प्रदूषणमुक्तीसाठी फोरमचा निर्णय

कृष्णा नदी प्रदूषणमुक्तीसाठी फोरमचा निर्णय

Next

वाई : ‘कृष्णामाई उत्सवानिमित्त सर्व संस्थाने, पक्षसंघटना, सामाजिक संस्था व सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन नदी काठावरील अतिक्रमणे व पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. नदी स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असूनही लोकांची चळवळ व्हावी,’ अशी अपेक्षा समूह संस्थेचे अध्यक्ष मकरंद शेंडे यांनी व्यक्त केली.
येथे यात्री निवासमधील सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पक्षविरहित नोंदणीकृत फोरम स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात
आला.
नदीच्या प्रदूषणामुळे शहराच्या सौंदर्याला, नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचत आहे. यासाठी गेल्या दीड-दोन वर्षांपासून समूह संस्था कृष्णा नदीतील प्रदूषणासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आज विविध संस्था, संघटना व मंडळे नदी परिसर व पात्राची स्वच्छता, प्लास्टिक गोळा करणे असे उपक्रम राबवित आहेत.
धोम येथील स्थानिक लोकांनी व ग्रामपंचायतीने नदीच्या उगमालगतच्या जलाशयाच्या स्वच्छतेसाठी प्रकल्प हाती घेतला आहे. येथे दोन किलोमीटरच्या परिसरात २५ कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे.
मात्र, हे प्रयत्न अपुरे पडत असून, निधी कमी पडत आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे काम करण्याची गरज आहे.
पुढील महिन्यात परंपरागत कृष्णामाईचा उत्सव सुरू होत आहे. महिनाभर चालणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घाटावरील संस्थानने आपल्या नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘अजेंडा’ तयार करून त्यानुसार वर्षभर उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नाकडे शासनाचे व पालिका पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी दबाव गट निर्माण करण्यासाठी तसेच विविध उपक्रमांसाठी कार्पोरेट क्षेत्रातून निधी मिळविण्यासाठी सर्व समावेशक व पक्षविरहित समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. भय्यासाहेब देशपांडे, डॉ. मदन जाधव, आनंद पटवर्धन, पी. एस. भिलारे, रामदास राऊत, भवरलाल ओसवाल, शिरीष कोठावळे, नितीन मेणवलीकर, सरपंच संतोष तांबे, महादेव गायकवाड, राजीव गायकवाड, ओंकार सपकाळ, गणेश जाधव आदींनी विचार मांडले. (प्रतिनिधी)

मान्यवरांच्या गैरहजेरीने नाराजी...
नदी प्रदूषणासंदर्भातील या बैठकीसाठी पालिका पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, नगरसेवक अथवा एकही अधिकारी हजर न राहिल्याने उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Forum decision for emancipation of Krishna river pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.