अंगणवाडी इमारतीचा पाया पावसामुळे खचला!
By admin | Published: June 25, 2015 09:30 PM2015-06-25T21:30:46+5:302015-06-25T21:30:46+5:30
टोणपेवाडीत धोका : व्हरांड्यात बसून चिमुरडी घेताहेत शिक्षण
कुडाळ : जावळी तालुक्यात संततधार पाऊस सुरूच असून, या पावसामुळे टोणपेवाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीची भिंत खचली आहे. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी अंगणवाडी प्रकल्पाधिकारी, महसूल विभागाचा एकही कर्मचारी अद्याप पोहोचलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्हरांड्यातच बसवून शिक्षण द्यावे लागत आहे. जावळी तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक झाडे रस्त्यात पडले असून, मुसळधार पावसामुळे अनेक घरे पडले आहेत. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.जावळी तालुक्यातील टोणपेवाडी या गावातील अंगणवाडी इमारतीजवळ असलेल्या दगडीताल ढासळल्याने इमारतीची भिंत खचली आहे. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर इमारत कधीही ढासळू शकते, असा धोका निर्माण झाला आहे.इमारतीलगत असलेल्या घरांनाही शेतातील दगडीताल वाहून गेल्याने धोका अधिक वाढला आहे. याची तालुका व जिल्हा प्रशासनाने गांभीर्यांने दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. यामुळे लहान मुलांबरोबरच पालकांमध्येही भितीचे वातावरण आहे. त्यामुळे काहीजण मुलांना शाळेत पाठविण्यास तयार होत नाहीत. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)