इन्शुरन्स मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी चौघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेकडून टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:21 PM2018-02-17T23:21:28+5:302018-02-17T23:21:47+5:30
सातारा : इन्शुरन्सची रक्कम मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी देऊन रक्कम लाटणाºया ट्रक मालकासह तीन भंगार व्यावसायिकांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून,
सातारा : इन्शुरन्सची रक्कम मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी देऊन रक्कम लाटणाºया ट्रक मालकासह तीन भंगार व्यावसायिकांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एक ट्रक आणि कार असा सुमारे २३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
आसिफ रफिक पठाण (वय २९, रा. राजोपाध्येनगर, ता. करवीर जि. कोल्हापूर), जमीर इब्राहिम हारचीकर (४०, रा. जवाहरनगर, सिरत मौहल्ला, कोल्हापूर), अन्वर दाऊद कच्छी (५६, रा. विश्वकर्मा कॉम्प्लेक्स, संभाजीगनर, कोल्हापूर), अतुल सुभाषचंद्र साळुंखे (३३, रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली, सातारा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
येथील शिवराज तिकाटणेजवळ रस्त्याकडे ट्रक उभा करून दोघेजण संशयितरीत्या उभे राहिले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांच्याजवळील ट्रक भंगारात विकण्यासाठी आणला असल्याची माहिती पोलिसांना दिली. हा ट्रक त्यांनी कोल्हापूर येथील भंगार व्यावसायिकाकडून खरेदी केला असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कोल्हापुरातील भंगार व्यावसायिकाला अटक केली. त्यालाही पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सारा प्रकार उघड केला.
ट्रक मालक अतुल साळुंखे याने स्वत: चा ट्रक कोल्हापुरातील भंगार व्यावसायिकाल विकल्याचे सांगितले. त्यानंतर ट्रक चोरीस गेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद केली होती.त्यानंतर त्याने विम्याची रक्कमही कंपनीकडून वसूल केली होती. एक गुन्हा पचल्यानंतर या टोळीने इस्लामपूर, सांगली म्हापसा (गोवा) तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्यामध्ये ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी दाखल केल्या असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने करून या टोळीतील चौघांनाही अटक केली.
आठ गुन्हे उघडकीस
सातारा जिल्ह्यात ट्रक चोरीचे ६ गुन्हे, सांगली जिल्ह्यात १, गोवा राज्यात कार चोरीचा एक असे एकूण ८ गुन्हे या टोळीने केल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.