सोनगाव येथे शेतातील मुरुम उचलण्यावरून चौघांना मारहाण; दहा जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:15+5:302021-05-26T04:39:15+5:30
शेंद्रे : शेतातील विहिरीलगतचा मुरुम काढू नका, तसेच आमच्या विहिरीला नुकसान होईल, असे काम करू नका, असे सांगितले. याच्या ...
शेंद्रे : शेतातील विहिरीलगतचा मुरुम काढू नका, तसेच आमच्या विहिरीला नुकसान होईल, असे काम करू नका, असे सांगितले. याच्या कारणावरून सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा येथील एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह दोन मुलांना मारहाण करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी साठेवाडी सोनगाव येथीलच दहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, तक्रारदार आनंद मधुकर कदम व त्यांचे वडील मधुकर कदम यांनी शेतातील रस्ता करताना, विहिरीलगतचा मुरुम काढू नका. मुरुम काढल्याने आमच्या विहिरीचे पावसाळ्यात नुकसान होईल, असे सांगितले. त्यामुळे चिडून जाऊन दहा जणांच्या जमावाने आनंद मधुकर कदम, मधुकर कदम,सुलोचना कदम, प्रवीण कदम यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत आनंद मधुकर कदम यांच्या डोक्यात बजरंग गोविंद कदम यांनी कुर्हाड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी इतर आरोपींनीही आनंद कदम व कुटुंबातील इतर लोकांना लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केली.
या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी श्रीरंग गोविंद कदम, वसंत गोविंद कदम, बजरंग गोविंद कदम, संतोष रघुनाथ कदम, माणिक शिवराम कदम, तानाजी साहेबराव कदम, प्रदीप अर्जुन कदम, अर्जुन कोंडीबा कदम, अशोक कोंडीबा कदम, नीलेश श्रीरंग कदम सर्व राहणार साठेवाडी सोनगाव तर्फ सातारा यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.