गंजलेल्या चारशे कुलपांना पुन्हा दारूचा घमघमाट
By admin | Published: July 6, 2017 11:54 PM2017-07-06T23:54:06+5:302017-07-06T23:54:06+5:30
गंजलेल्या चारशे कुलपांना पुन्हा दारूचा घमघमाट
प्रशांत कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महामार्गावरील मद्यबंदी निर्णयाची अंमलबजावणी करताना शहरातून जाणारे महामार्ग वगळले तर त्यात गैर काहीही नाही. राज्य सरकार असे मार्ग वगळून मद्यविक्री परवानगी देऊ शकतात, असे सर्वोेच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सुमारे चारशेपेक्षाही जास्त ठिकाणी बंद असलेली दारू दुकाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. गंजलेल्या कुलपांना पुन्हा दारूचा घमघमाट सुटू शकतो.
न्यायालयाच्या या भूमिकेमुळे दारू व्यावसायिकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गापासून ५०० नंतर २२० मीटरपर्यंत असणारी देशी-विदेशी दारू दुकाने व परमीट रूम बिअर बार १ एप्रिलपासून बंद करण्यात आले आहेत. सर्वोेच्च न्यायालयाने राष्ट्रीय मार्ग आणि राज्य मार्गालगत असणारी दारू दुकाने, परमीट रूम आणि बिअर बार बंद करण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ६१५ दारू दुकाने आणि बार पैकी ५०२ देशी-विदेशी दारूची दुकाने, परमीट रूम आणि बार बंद करण्यात आले आहेत. त्याचा फटकाही मोठ्या प्रमाणात महसूलला बसला आहे.
दरम्यान, एका याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने एखादा महामार्ग वळवून मद्यविक्रीला परवानगी देत असतील तर, त्यात काहीही गैर नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यातील गावांमध्ये बंद झालेली जवळपास चारशे दारू दुकाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी ठिकाणी जर हा निर्णय लागू झाला तर जिल्ह्यातील ५०२ दारू दुकाने, बार पैकी सुमारे ४०० दारू दुकाने सुरू होतील. परिणामी महसुलात वाढ होणार आहे. मात्र महिलांमधून या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
शासनाने यंदा सातारा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला देशी-विदेशी मद्यामधून ५८५ कोटींचा महसूल गोळा झाला पाहिजे, असे टार्गेट दिले आहे, पण दारूबंदीच्या निर्णयानंतर ८० कोटी महसूल जमा करणेही त्यांना शक्य होईनासे झाले आहे.
दारूबंदीचा परिणाम महसुलावर झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील आणि शहरी आणि ग्रामीण अंतर्गत भागात असणारी दारू दुकाने, परमीट रूम, बिअर बार पुन्हा पूर्ववत होतील, असा अंदाज व्यावसायिकांनी बांधला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने बार मालकांना दिलासा मिळाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिअरबार मालकांचे लक्ष या निर्णयाकडे लागून राहिले आहे.
गावठाण भागातील दुकाने हाऊस फुल्ल
सातारा शहरातील मल्हार पेठ, गोडोली, नगरपालिकानजीक तसेच नगरवाचनालयजवळ रात्रीच्या वेळेस ग्राहकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी असलेल्या दारू दुकानांना सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत यात्रेचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच गुहागर-पंढरपूर राज्यमार्गावरील कऱ्हाड-ढेबेवाडी या मार्गावर दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. कऱ्हाड शहरातील दुकाने बंद असल्याने मद्यपींची पावले आपसुकच या मार्गाकडे वळत आहेत. तसेच वडूज या ठिकाणी चोरी छुपके पद्धतीने विक्री सुरू आहे. दहिवडीमध्ये ही रात्रीच्या वेळी परिसरातील गावांमधील मद्यपींची वर्र्दळ होत आहे. शिरवळमध्ये आसपासच्या गावासह, परजिल्ह्यातील लोकांची मोठी राबता या ठिकाणी पाहताना मिळत आहे.