चार दिवसांच्या सुटीनंतर कोल्हापूर-सातारा लेनवर चार तास मेगा ब्लॉक!, उड्डाणपुलाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 03:31 PM2022-04-18T15:31:49+5:302022-04-18T15:44:18+5:30
महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोल्हापूर नाक्यावर वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी गर्दीतून मार्ग काढत महामार्गावरून कऱ्हाडमध्ये प्रवेश करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवेश करावा लागतो.
मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील कोल्हापूर नाका परिसरात वारंवार वाहतुकीची कोंडी होते. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाने रविवारी या ठिकाणी कोल्हापूर-सातारा लेनवर चार तास मेगा ब्लॉक होत आहे. ही गर्दी स्थानिकांची डोकेदुखी होत आहे. हे संकट टाळण्यासाठी येथे उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.
कऱ्हाड व मलकापूर शहराचे प्रवेशद्वारे म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी व किरकोळ अपघातांची नेहमी मालिकाच सुरू असते. तसेच कऱ्हाडलगतचे झपाट्याने वाढणारे शहर म्हणून मलकापूरची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे कऱ्हाडसह मलकापूरमध्ये तालुक्यातून व महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोल्हापूर नाक्यावर वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी गर्दीतून मार्ग काढत महामार्गावरून कऱ्हाडमध्ये प्रवेश करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवेश करावा लागतो.
येथे कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाण्यासाठी असलेल्या लेनवर उड्डाणपूल नसल्यामुळे कऱ्हाड शहरात येणारी वाहने व पुढे सातारा तसेच पुणे, मुंबईकडे जाणारी वाहने एकाच लेनवरून धावत असतात. महामार्गावर बऱ्याच वेळा सातारा, पुणे बाजूकडे जाणारी वाहने भरधाव वेगात असतात. तर शहरात येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला असतो. अशा परिस्थितीत अनेक वेळा अपघात घडले आहेत. प्रवासी घेण्यासाठी खासगी वाहने महामार्गावरच उभा केलेली असतात. तर प्रवासीही वाहनांची वाट बघत निम्या महार्गावर उभे राहिलेले असतात. त्यामुळे वेगात आसलेले वाहन उभ्या राहिलेल्या प्रवाशांमधे घुसून काही वेळा याठिकाणी लहान-मोठे अपघात घडले आहेत.
महामार्ग व्हीआयपी वडापने तर उपमार्ग स्थानिक वडापने हायजॅक केल्यामुळे याठिकाणी पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरूनच यावे जावे लागते. प्रत्येक रविवारी या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. आज चार दिवसांची सुटी संपवून चाकरमान्यांचा कामावर जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. परिणामी, कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी होऊन या लेनवर तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर-सातारा लेनवर लवकर उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.
रात्रीच्या वेळी खासगी बसचे थैमान...
कोल्हापूर नाक्यावर सायंकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत काही कामानिमित्त जायचे म्हटले की अंगावर काटाच उभा राहतो, अशी भावना स्थानिक नागरिकांची झाली आहे. रात्रीच्या वेळी शेकडो खासगी प्रवासी बस कोल्हापूर नाक्यावरून पुण्या-मुंबईकडे जातात. त्यातील बहुतांश बस प्रवासी घेण्यासाठी उपमार्गासह महामार्गावरच बस उभ्या करून थैमान सुरू असते.