Khambatki Ghat: खंबाटकी घाटात वाहतुकीचा बोजवारा!, चार तास वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 03:10 PM2022-05-05T15:10:34+5:302022-05-05T15:11:28+5:30
तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती, त्यामुळे प्रवासी वैतागून गेले.
खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात खामजाई मंदिरालगत एक मोठा कंटेनर अचानक बंद पडल्याने घाट रस्ता ठप्प झाला होता. कंटेनर बोजड असल्याने तो बाजूला काढणे जिकरीचे झाले. त्यातच मे महिन्याच्या सुट्या असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यामुळे खंबाटकी घाटाच्या पायथ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती, त्यामुळे प्रवासी वैतागून गेले.
पुण्याहून-साताऱ्याकडे जात असताना घाटमाथ्यावर दत्तमंदिर व खामजाई मंदिर परिसरात चार पदरीचे काम रखडल्याने येथे सिंगल लेन सुरू होते. यामुळे येथे वाहने बंद पडून अनेक वेळा घाट जाम होत असतो, तसेच या ठिकाणी एक कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
सकाळपासून वाहतूक वाढल्याने खंबाटकी घाटात अचानक वाहतूक कोंडी झाली. अनेकांची तारांबळ पहायला मिळाली. दरम्यान, कोंडी झालेली काही वाहने कॅनॉल मार्गे बोगद्याकडे गेली. त्यामुळे बोगद्यामार्गे वाहतुकीला अडचणी होत होत्या. पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत होते. खंडाळा पोलिसांनीही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत घाटातील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
अपुऱ्या सुविधा..
महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याची कामे केली आहेत. मात्र खंबाटकी घाटात वाहतुकीस अडथळा झाल्यास तो काढण्यासाठी मोठ्या क्रेन नाहीत. प्राधिकरण व ठेकेदार टोल वसुली करतात मग महामार्गावर सुविधा का देत नाहीत, असा प्रश्न प्रवाशांना पडला होता. पुरेशी साधने नसल्याने महामार्ग वाहतूक पोलिसांचीही मोठी अडचण झाली होती.