चारशे एकर ऊस तोडीअभावी उभा!

By admin | Published: February 23, 2015 09:10 PM2015-02-23T21:10:50+5:302015-02-25T00:15:12+5:30

खटावमधील शेतकरी हवालदिल : आंदोलनाचा पवित्रा; कारखान्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप

Four hundred acres of sugarcane! | चारशे एकर ऊस तोडीअभावी उभा!

चारशे एकर ऊस तोडीअभावी उभा!

Next

खटाव : साखर कारखान्यांची मनमानी तसेच अनेक जाचक अटींमुळे खटावसह परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच वाळू लागला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खटाव तसेच परिसरात अद्यापही सुमारे चारशे एकर ऊस जागेवर तोडणी वाचून उभा आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. याला कारण कारखानदार आहेत, असा आरोपही शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. खटावपासून सुमारे वीस किलोमीटरवर कोरेगाव तालुक्यात जरंडेश्वर साखर कारखाना आहे. त्याचबरोबर दुसरीकडेही वीस किलोमीटरवर गोपूजजवळ ग्रीन पॉवर अ‍ॅन्ड शुगर कारखाना आहे. या कारखान्यांनी ऊस बियाणे आणि ठिबक सिंचन, तसेच खते वाटप करून शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित केले होते. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी बागायती क्षेत्रापेक्षा ऊस लागवडीचे क्षेत्र वाढवून उसाची लागण केली. या लागणीस १२ ते १४ महिने होऊनही दोन्ही कारखाने जाणीवपूर्वक रिकव्हरी लागत नाही. प्रोग्राम तयार नाही, अशा काहीही सबबी सांगून ऊस तोडणीस नकार देत आहेत, असे शेतकऱ्यांच्यातून सांगण्यात येत आहे. गोपूज कारखान्याचे अंदाजे या भागात दोनशे ते तीनशे शेअर्सधारक सभासद आहेत. या सभासदांचा ऊस न तोडता कार्यक्षेत्राबाहेरील बिगर सभासदांचा ऊस तोडला जात आहे. सद्य:स्थितीत दुष्काळी भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आता आपला ऊस डोळ्यांदेखत वाळून जाताना पाहावे लागत आहे. त्यातच तोडणी कामगारांनी एकरी सात ते दहा हजारांपर्यंत दर वाढवले आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांनीे साखर कारखान्याशी वेळोवळी संपर्क साधला आहे. संबंधितांकडून चुकीची उत्तरे देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. (वार्ताहर)


शेतकऱ्यांचे कारखान्याकडे शेअर्स आहेत. त्या शेअर्सधारकांचासुद्धा ऊस तोडला जात नाही. त्याला अनेक कारणे पुढे आणली जात आहेत. शेअर्सधारकांची ही अवस्था असेल तर सर्व सामान्य शेतकऱ्यांची काय गत. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने उसाची लागवड केली आहे. परंतु कारखानदार तसेच ऊसतोड टोळीकडून त्यांची आर्थिक अडचण निर्माण केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संतापला आहे. आधीच ऊस तोडणीला उशीर झाला असताना कारखाना प्रशासनाकडून काहीही कारणे सांगून शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे, ती थांबवावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल हे निश्चित.
- किशोर डंगारे, ऊस उत्पादक शेतकरी

बाहेरील उसाची वाहतूक रोखणार...
कारखाना प्रशासनाची हीच भूमिका राहिल्यास खटावसह भागातील शेतकरी कोणतीही पूर्व कल्पना न देता रस्त्यावर उतरणार आहेत. या भागातून बाहेरून येणारी उसाची वाहतूक करणारी वाहने रोकण्यात येणार असून, संबंधित प्रशासकीय विभागाने या बाबीकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा होणाऱ्या नुकसानास शेतकरी जबाबदार राहणार नाहीत, असा इशारा खटावसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याचे शेअर्सधारक सभासद यांनी दिला आहे.

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. पाण्याची तीव्र टंचाई असतानाही ऊस जोमाने वाढवून उभा केला आहे. परंतु कारखान्यांकडून तो वेळेत न तोडण्यामुळे जागेवरच त्याचे वजन घटत आहे. तर पाणी टंचाईमुळे काही भागातील ऊस वाळून जाऊ लागला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंत्तातूर झाला आहे.
- राजेंद्र करळे , शेतकरी खटाव

Web Title: Four hundred acres of sugarcane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.