महामार्गावर चारशे पोलिसांचा शेतकरी संपावर वॉच!
By admin | Published: June 6, 2017 07:11 PM2017-06-06T19:11:59+5:302017-06-06T19:11:59+5:30
वाहनांची तोडफोड होऊ नये म्हणून बंदोबस्त
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 0६ : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे दूध आणि भाज्यांची आवक ठप्प होऊ नये म्हणून जिल्हा पोलिस दलाच्या वतीने महामार्गावर तब्बल चारशे पोलिसांचा वॉच अद्याप कायम आहे.
महामार्गावर वाहनांची तोडफोड होऊ नये म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. शिरवळ, खंडाळा, भुर्इंज, सातारा, बोरगाव, कऱ्हाड, तळबीड ही पोलिस ठाणे महामार्गालगत आहेत. या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपपल्या हद्दीतीतील महामार्गावर बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर या पोलिसांच्या मदतीला जादा कुमकही देण्यात आली आहे. रात्रंदिवस पोलिस महामार्गावर बंदोबस्त करताना दिसत आहेत. दूध आणि भाज्या घेऊन येणारे ट्रक बंदोबस्तात जागेपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. महामार्गावर बघेल तिकडे पोलिस दिसत असल्यामुळे आंदोलकांनी महामार्गावर आंदोलन करण्यासाठी पाठ फिरविली आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी महामार्गावर असलेल्या दूध डेअरीवर बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात आंदोलनाची धार कमी झाली आहे. सकाळी नेहमीप्रमाणे मंडई सुरू होती. केवळ आता पोलिसांनी महामार्गावरच लक्ष केंद्रीत केले आहे. रात्री बारा ते पहाटे चारपर्यंत पोलिस डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील वाढे फाट्यावर ट्रक चालकाला मारहाण करून दरोड्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी वाहनांचीही तपासणी सुरू केली आहे.
महामार्गावर पेट्रोलिंग करणारे पोलिसही इतर पोलिसांच्या मदतीला आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून एकाही वाहनाची तोडफोड झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.