CoronaVirus Positive News पंजाबमधून ते कोकण, मुंबई, सातारा, सांगलीत रेल्वेने येणार : श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:20 PM2020-05-19T20:20:27+5:302020-05-19T20:38:25+5:30
त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार आपल्या घरी परतणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
क-हाड : अमृतसर-पंजाब येथे महाराष्ट्रातील सोन्याचे दागिने बनविणारे कारागीर आपल्या परिवारासह अडकून राहिले आहेत. त्यांना राज्यात परत आणण्यासाठी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मूळ महाराष्ट्रीयन आणि पंजाबमध्ये कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी डॉ. केतन पाटील यांच्याशी समन्वय साधत केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये अडकलेल्या शेकडो गलाई कामगारांना येत्या दोन दिवसांत आपल्या मायभूमीत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंजाबमधील अमृतसर आणि परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याच्या व्यवसायानिमित्ताने गेलेले महाराष्ट्रातील शेकडो नागरिक लॉकडाऊन परिस्थितीमुळे तेथेच अडकून राहिले आहेत. कोरोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने या कारागिरांना आर्थिक समस्यांसह इतर अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रारंभी सुमारे चारशे कामगार आणि त्यांचा परिवार महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र त्यांना यात यश मिळाले नाही. त्यातील काही नागरिकांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली होती. खासदार पाटील यांनी पंजाब पोलीस दलात कार्यरत असलेले केतन पाटील यांच्याशी संपर्क साधून सुरुवातीला एसटीने कामगारांच्या परतीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. तसेच सांगलीच्या कामगारांची संख्या जास्त असल्याने सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी अमृतसर व सांगलीचे आयएएस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत केंद्र्राकडे पाठपुरावा करून मदतीची चक्रे वेगाने फिरविली. रेल्वे खात्याने संबंधित नागरिकांसाठी रेल्वेची मंजुरी दिली असून, अमृतसर ते सांगली आणि अमृतसर ते मुंबई अशा दोन रेल्वे टप्प्याने सुटणार आहेत. त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार आपल्या घरी परतणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पंजाबमध्ये अडकलेले गलाई व्यावसायिक येत्या दोन-तीन दिवसांत आपल्या मायभूमीत परततील. रेल्वेच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली आहे.
- श्रीनिवास पाटील , खासदार, सातारा