शिरवळजवळ विचित्र अपघातात चार जखमी

By admin | Published: June 3, 2017 12:20 PM2017-06-03T12:20:03+5:302017-06-03T12:20:03+5:30

टेम्पो, कार अन् जीपची धडक

Four injured in a strange accident near Shirwal | शिरवळजवळ विचित्र अपघातात चार जखमी

शिरवळजवळ विचित्र अपघातात चार जखमी

Next

आॅनलाईन लोकमत

शिरवळ (सातारा), दि. 0३ : : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ हद्दीत रस्ता दुभाजकालगत शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातांत चार जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून शिरवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील विकास शिवाजी बल्लाळ (वय ३०) हे पत्नी धनश्री यांच्यासमवेत दोन दिवस सुटीसाठी चिंचवडहून मूळ गावी सातारा तालुक्यातील कुसवडेला कार (एमएच ११ एके ०६६०) ने निघाले होते. त्यांची कार शिरवळ हद्दीत आली असता अचानकपणे रस्ता दुभाजकांसमोरून शिरवळ येथील बाजार उरकून तीन चाकी टेम्पो रस्ता दुभाजक ओलांडण्यासाठी आडवा आला. टेम्पो अचानक आडवा आल्याने कारची जोरदार धडक बसून टेम्पो (एमएच १२ एलडी ५२८) हा उंच उडून रस्ता दुभाजकामध्ये जाऊन पडला.

यावेळी कारच्या पाठीमागे असणारी जीप (एमएच ५० ए २६७०) ने कारला जोरदार धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक सुरेश गोविंद कानडे (वय ५८) हे गंभीर जखमी झाले. तर लता सुरेश कानडे (५५, दोघे रा. पिराचा मळा, भोर जिल्हा पुणे) तसेच कारमधील विकास शिवाजी बल्लाळ (३०) व धनश्री विकास बल्लाळ (२९) हे कारच्या काचेवर पडल्याने जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच शिरवळचे पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने पोलिस जीप व खाजगी वाहनाने शिरवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या सुरेश कानडे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

या घटनेची फिर्याद कारचालक विकास बल्लाळ यांनी शिरवळ पोलिस स्टेशनला दिली असून या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे करीत आहे.

जीव धोक्यात घालून फोटोग्राफी

शिरवळ येथील शिर्के कंपनीजवळ झालेल्या अपघातानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. यावेळी वाहतूक सुरळीत करताना बघ्यांना आवरताना शिरवळ पोलिसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावेळी बघे मात्र अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी मोबाईलवर महामार्गावर जीव धोक्यात घालून फोटो काढत सदरच्या अपघाताची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात धन्यता मानत होते. दरम्यान अपघातानंतरही दुचाकीचालक व चारचाकी चालक धोकादायकरीत्या विरुद्ध दिशेने महामार्ग ओलांडत होते.

Web Title: Four injured in a strange accident near Shirwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.