Satara: भरधाव पोलीस जीपने चौघांना उडवले; युवक ठार
By संजय पाटील | Published: October 23, 2023 11:42 AM2023-10-23T11:42:12+5:302023-10-23T11:43:13+5:30
जीपचालक पोलिसांवर गुन्हा दाखल
कऱ्हाड : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर भरधाव पोलीस जीपने चौघांना उडवले. त्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. कुसुर, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी ढेबेवाडी मार्गावर गर्दी केली होती. पोलिसांनीही तात्काळ त्याठिकाणी धाव घेत चालक पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.
सुजल उत्तम कांबळे (वय १७, रा. कोळेवाडी, ता. कऱ्हाड) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी पोलीस ठाण्याची जीप रविवारी रात्री उशिरा कऱ्हाडहुन ढेबेवाडीच्या दिशेने निघाली होती. पोलीस कर्मचारी शंकर खेतमर हा जीप चालवीत होता. कुसर गावच्या हद्दीत आल्यानंतर अचानक चालकाचा जीपवरील ताबा सुटला. त्यामुळे जीपने चौघांना उडवले. त्यामध्ये सुजल कांबळे या युवकाचा मृत्यू झाला. तर इतर तिघांना परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी ढेबेवाडी मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. या अपघात प्रकरणी पोलीस जीपचालक शंकर खेतमर याच्यावर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.