चार आण्याची शेती... बारा आण्याची मजुरी

By admin | Published: June 18, 2015 10:04 PM2015-06-18T22:04:24+5:302015-06-19T00:21:44+5:30

चार आण्याची शेती... बारा आण्याची मजुरी

Four mango farming ... twelve auctioned labor | चार आण्याची शेती... बारा आण्याची मजुरी

चार आण्याची शेती... बारा आण्याची मजुरी

Next

कोपर्डे हवेली : दिवसेंदिवस वाढत असलेले खताचे दर, उत्पादनाच्या खर्चामध्ये झालेली वाढ, नैसर्गिक आपत्ती, उत्पादनाला बाजारपेठेत मिळणारा नीचांकी दर, मशागतीचा खर्च, बियाणांची दरवाढ, प्रत्येक वर्षी वाढत जाणारी मजुरी आदी कारणांमुळे बागायतदारांना शेती नको वाटू लागली आहे.
काही वर्षांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, असे समजले जात होते. मात्र, सध्या याच्या उलट स्थिती आहे. शेतकरी चारी बाजूंनी संकटात सापडला असल्याने शेती कनिष्ठ दर्जाची होऊन बसली आहे.
बागायती क्षेत्रामध्ये दरवर्षी मजुरांकाडून दरवाढ केली जाते. शहरालगतच्या गावांमध्ये मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. शेतीच्या कामासाठी ऐनवेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. परगावाहून स्वखर्चाने त्यांना जादा मजुरी देऊन शेतीकामासाठी आणले जात आहे. शेतीच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी उसाला चांगला दर मिळत होता. तर यावर्षी अ‍ॅडव्हान्स म्हणून साखर कारखानदारांनी काही रकमा दिल्या आहेत. पुन्हा दर किती मिळणार, याविषयी यावर्षी अनिश्चितता आहे. शेतकऱ्यांना उसाला दर कमी मिळाला म्हणून मजुरीचे दर कमी होणार
नाहीत.
शेतकऱ्यांच्या मालाचे दर कमी जास्त होऊ शकतात; पण उत्पादन खर्चामध्ये वाढीचा आलेख उंचावत आहे.
शेतीमधून फायदा मिळण्याऐवजी शेतकऱ्यांचा तोटा दिसत आहे. भांगलण, उसाची लागण, टोकणी, औषधे फवारणी, सऱ्यांची तोंडे करणे, उसाची पाचट काढणे आदी कामे मजुरांकडून करून घेतली जातात. प्रत्येक शेतकरी मजुरांवर अवलंबून असतो.
काही ठिकाणी मजुरांचा तुटवडा असल्यामुळे शेतीतील कामे वेळेत होत नसल्याने पिकांच्यावर परिणाम होत असून, उत्पादन घटत आहे. (वार्ताहर)


सोयाबीनचा उत्पादन खर्चही नाही
जिरायती क्षेत्रामधील शेतकरी खरिपामध्ये सोयाबीन, भुईमूग, घेवडा आदींसह इतर पिकांचे उत्पादन घेतो. जास्त क्षेत्र सोयाबीनचे असते. गेल्या वर्षी सोयाबीनचा क्विंटलचा दर ३ हजारांपासून ३ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला. उत्पादन घटल्याने अनेकांचा उत्पादन खर्च निघाला नाही.
बागायती शेतकरी नावालाच बागायती उरला आहे. मजुरीचा खर्च वाचविण्यासाठी सध्या शेतकऱ्याला स्वत:च शेतीमध्ये कष्ट करणे गरजेचे बनले आहे. तसेच शेतीमध्ये यांत्रिकीकरणही वाढत चालले आहे.
माळव्याची पिके घेणारे अडचणीत
बागायती क्षेत्रामध्येच मजुरांचा तुटवडा जाणवतो. माळव्याची पिके घेतल्यानंतर कायमच मजुरांची गरज भासते. गेली दोन वर्षे माळव्याच्या पिकांना दर नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.


ऊसतोड मजुरांची मनमानी
साखरेला दर कमी असल्यामुळे उसाची शेती धोक्यात आली आहे. त्यामध्ये ऊस कारखाने बंद होत असताना शेवटी ऊसतोड मजुरांना एकरी ७ हजार रुपये पासून १० हजार रुपये शेतकऱ्यांना स्वत:च्या खिशातून द्यावे लागले.


मजुरीचे वाढते दर
उसाचा पाला काढणे : एकरी ३ हजार ५०० ते ४ हजार
टोकणी महिला : प्रतिदिन २०० रुपये
औषधाची पंप फवारणी : एका पंपासाठी ४० ते ५० रुपये
पुरुषाची दिवसाची हजेरी : प्रतिदिन २५० ते ३०० रुपये
पाला काढण्यासाठी महिलेस सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत १५० रुपये तर संपूर्ण दिवस सकाळी ११ ते ५ पर्यंत २०० रुपये आहे.
मजुरीसोबत वैरण मोफत
पुरुष व महिला शेतमजूर शेतामध्ये कामाला येतात, त्यावेळी जनावरांना चारा घेऊन जातात. काही वेळेस जळण, तसेच शेतातील भाजीपाला शेतकरी मोफत देत असतात. हजेरीबरोबर त्यांचा फायदाही होत असतो.
मजुरांच्या दरवाढीने शेतकरी मेटाकुटीला

शेतातून मिळणारा फायदा कमी आणि तोटा जास्त अशीच शेतकऱ्यांची अवस्था झाल्याने दिसून क्षेत्र आहे. ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला,’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

Web Title: Four mango farming ... twelve auctioned labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.