सातारकराने शोधल्यात पालींच्या चार नव्या प्रजाती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:02 PM2018-08-28T23:02:52+5:302018-08-28T23:02:58+5:30
सातारा : जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या पश्चिम घाटात अनेक वर्षे अभ्यास करून साताºयाच्या अमित सय्यद या संशोधकाने चार नव्या पालींच्या प्रजातींचा शोध लावला आहे.
अफ्रिका तसेच आशियात आढळून येणाºया पालींच्या कुळातील निमास्पीस हे एक कूळ आहे. जगभरात निमास्पीस कुळातील १३५ प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यापैकी २९ प्रजाती या भारतातील आहेत. सातारचे संशोधक अमित सय्यद हे गेल्या चार वर्षांपासून या प्रजातींचा अभ्यास करत होते. त्यांनी यापूर्वी बेडकाच्या घाटीज् बुशफॉग व पालीची येलो बेलिड डेगेको जातीचा शोध लावला होता.
यापूर्वी पश्चिम घाटात निमास्पीस या कुळातील पालींच्या नोंदी होत्या. त्यांचा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया या संस्थेत अभ्यास केल्यानंतर सय्यद यांनी पश्चिम घाटातील डोंगर व जंगलात फिरून संशोधन केले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीनजीक मारुतवाडी येथून निमास्पीस लिमयी, महाबळेश्वरमधून निमास्पीस अजिजी, तामिनी घाट, पुणे येथून निमास्पीस महाबली आणि सिंधुदुर्ग अंबोली घाटातून निमास्पीस अम्बोलीएन्सीस अशा चार प्रजाती शोधून काढल्या. सय्यद यांनी शोधलेल्या या चारही पाली निमास्पीस या कुळातील आहेत. त्यांच्या संशोधनानंतर अमेरिकेतील अॅम्फिबियन अँड रेपटाईन कन्झर्वेशन या नियतकालामध्ये शोधनिंबध प्रसिद्ध झाला आहे.
आढळलेल्या नव्या प्रजातींना दिले नाव
अमित सय्यद याने शोध लावलेल्या प्रजातीमधील निमास्पीस लिमयी हे नाव वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान सुनील लिमये यांच्या नावावरून तसचे निमास्पीस अजिजी हे नाव अमित यांच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.