मेढ्यातील चाैघेजण दोन वर्षांसाठी तडीपार

By नितीन काळेल | Published: March 29, 2024 07:45 PM2024-03-29T19:45:20+5:302024-03-29T19:45:32+5:30

पोलिसांत विविध गुन्हे नोंद : जिल्ह्यातून बाहेर जावे लागणार

four of Medha out of district for two years | मेढ्यातील चाैघेजण दोन वर्षांसाठी तडीपार

मेढ्यातील चाैघेजण दोन वर्षांसाठी तडीपार

सातारा : गर्दी मारामारीसह खुनाचा प्रयत्न, दुखापत पोहोचविणे यासह विविध गुन्हे पोलिसांत नोंद असलेल्या मेढा येथील चाैघांना दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी ही कारवाई केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जावळी तालुक्यातील मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने गुन्हे करणारी टोळी कार्यरत होती. या टोळीचा प्रमुख प्रेम उर्फ बबलू विलास पार्टे (वय २४), गणेश विष्णू शिंदे (वय २३), सनी विकास कासुर्डे (वय २२) आणि राहुल रामा कुऱ्हाडे (वय २५, सर्वजण राहणार मेढा) यांच्यावर मेढा पोलिस ठाण्यात अवैध दारुची विक्री करणे, मारामारीसह विविध प्रकारचे गुन्ह नोंद होते. त्यामुळे मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी या टोळीविरोधात तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठवलेला. कारण, टोळीतील आरोपींवर वारंवार कारवाई होऊनही त्यांच्या प्रवृत्तीत चांगला बदल होत नव्हता. तसेच ते मेढा परिसरात गुन्हेच करीत होते. यामुळे या टोळीवर कारवाईची मागणी नागरिकांतून होत होती.

पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर सुनावणी होऊन चाैघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक तानाजी माने, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, मेढा पोलिस ठाण्यातील हवालदार महेश शिंदे यांनी तडीपार प्राधिकरणपुढे योग्य पुरावे सादर केले.

सव्वा वर्षात ९६ जण तडीपार...
जिल्हा पोलिस दलाने नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत ९६ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. विविध कलमान्वये संबंधितांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारी, मोक्का, एमपीडीए यासारख्या कारवाया करण्यात येतील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

 

Web Title: four of Medha out of district for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.