चिखलीतील चारजणांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 05:33 PM2019-03-14T17:33:24+5:302019-03-14T17:36:05+5:30
कऱ्हाड तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बांधलेल्या सांस्कृतिक व सामाजिक सभागृहाला माजी सरपंच शामराव आबाजी चव्हाण हे नाव देण्यात आले आहे. या नावावरून आक्रमक पावित्रा घेत हे नाव काढून टाकण्यात यावे, या मागणीसाठी दीड वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे सांगत गुरुवारी कऱ्हाडपंचायत समिती येथे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या केबिनमध्ये ग्रामपंचायत सदस्य, तक्रारदार व अन्य दोघांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बांधलेल्या सांस्कृतिक व सामाजिक सभागृहाला माजी सरपंच शामराव आबाजी चव्हाण हे नाव देण्यात आले आहे. या नावावरून आक्रमक पावित्रा घेत हे नाव काढून टाकण्यात यावे, या मागणीसाठी दीड वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे सांगत गुरुवारी कऱ्हाडपंचायत समिती येथे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या केबिनमध्ये ग्रामपंचायत सदस्य, तक्रारदार व अन्य दोघांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या सामाजिक सभागृहाला देण्यात आलेले शामराव आबाजी चव्हाण हे नाव काढून टाकण्यात यावे, अशी तक्रार गावातील महेश धर्मेंद्र पाटील यांनी वर्षभरापूर्वी केली होती. या तक्रारीवरून सदस्य बंडोराव ज्ञानदेव सावंत यांच्यासह सदस्य तसेच काही ग्रामस्थांनी सभागृहास दिलेल्या नावास विरोध केला तर ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी हे नाव काढले जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
ग्रामपंचायतीमधील या दोन्ही गटांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी हे नाव कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याने ते काढून टाकण्यात यावे, असे पत्र ग्रामसेवक चंद्रकांत धिंदळे यांना दिले. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे तक्रारदार महेश पाटील यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही याबाबतचे पत्र दिले होते.
दरम्यान, गुरुवारी दोन्ही गटांतील सदस्य व तक्रारदार यांना चर्चेसाठी गटविकास अधिकारी डॉ. पवार यांनी कार्यालयात बोलावले. बैठकीस सरपंच वंदना माळी, ग्रामसेवक चंद्रकांत धिंदळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
बैठकीत गटविकास अधिकारी डॉ. पवार यांनी चिखली येथील सांस्कृतिक सभागृहास दिलेले संबंधितांचे नाव काढावे लागेल, असे सदस्यांना सांगितले. मात्र सदस्यांनी ते नाव काढणार नसल्याचे सांगितले, त्यामुळे नाराज झालेल्या तक्रारदार महेश पाटील, सदस्य बंडोराव सावंत, विजय सदाशिव जगताप, बापूराव रामदास जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातच अधिकाऱ्यांसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करीत त्यांना रोखले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी संबंधितांना कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिले.