Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी
By दत्ता यादव | Published: July 17, 2024 01:38 PM2024-07-17T13:38:10+5:302024-07-17T13:39:06+5:30
महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील घटना
सातारा : सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील वेण्णा नदीच्या पुलावरून कार चाळीस फूट खोल कोसळून चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात काल, मंगळवारी रात्री दहा वाजता झाला असून, जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जावळी तालुक्यातील करहरमधील एक कुटुंबीय महाबळेश्वरहून साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी आंबेघर, ता. जावळी येथील गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलाचा छोटा संरक्षक कठडा तोडून वेण्णा नदीत कोसळली. यात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर माेठा आवाज झाल्याने आंबेघरमधील ग्रामस्थ तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी जखमींना नदीतून बाहेर काढले. कोणाच्या डोक्याला तर कोणाच्या हातापायाला जखम झाली. तब्बल चाळीस फुटांवरून कार नदीत कोसळल्याने कारचेही मोठे नुकसान झाले. पाण्यात कार कोसळल्याने कारमधील लोकांना फारसी जखम झाली नसल्याचे मेढा पोलिसांनी सांगितले.
ना दिशादर्शक, ना संरक्षक कठडे
महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर परिसरात असणाऱ्या पुलावर कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे नाहीत. तसेच दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवख्या वाहन चालकाला रस्त्याच्या अंदाज येत नाही. परिणामी अशाप्रकारे अपघात होत आहेत. या रस्त्याचे नुकतेच रुंदीकरण आणि डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. परंतु इतर उपाययोजना केल्या गेल्या नसल्यामुळे जीवघेणे अपघात होत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.