चोरीप्रकरणी चौघे जण पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:52 AM2021-02-27T04:52:51+5:302021-02-27T04:52:51+5:30
फलटण : फलटण शहरातील महिला व मुलींच्या हातातील मोबाइल पर्स जबरदस्तीने हिसकावून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास आणि त्याचा माल ...
फलटण : फलटण शहरातील महिला व मुलींच्या हातातील मोबाइल पर्स जबरदस्तीने हिसकावून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास आणि त्याचा माल खरेदी करणाऱ्या तिघांना फलटण शहर पोलिसांनी शिताफीने पकडून दोन लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख अजय कुमार बन्सल यांनी दिली.
सुरेश रमेश कदम (रा. ब्राह्मण गल्ली, फलटण) असे चोरीप्रकरणी अटक केलेल्याचे तर आशीष हेमंत अहिवळे (रा. सोमंथळी), मयूर संजय साळवे, सौरभ संभाजी जाधव (दोघे रा. सुरवडी) अशी माल घेणाऱ्यांची नावे आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून फलटण शहरात लक्ष्मीनगर, संजीवराजेनगर, गोळीबार मैदान, स्वामी विवेकानंदनगर, अनंत मंगल कार्यालय या भागांसह फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकीवरून जा-ये करणाऱ्या विशेषत: महिला व मुलींना टार्गेट करून एक अनोळखी २० ते २२ वर्षे वयाचा चोरटा त्यांचा पाठलाग करीत त्यांच्यापाठोपाठ मोटारसायकल चालवत जात असत. आजूबाजूला तसेच मागेपुढे कोण नाही, हे पाहून संधी मिळताच महिला, मुलींच्या हातातील पर्स अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून, याशिवाय रस्त्याने मोबाइल फोनवर बोलत जाणाऱ्या महिला व मुलीच्या हातांतील मोबाइल जबरदस्तीने ओढून पोबारा करत होता. त्यास फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भारत किंद्रे यांच्या पथकाने जेरबंद केलेले आहे. सुरेश कदम याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या माहितीवरून चोरीचा माल घेणाऱ्या आशीष अहिवळे, मयूर साळवे, सौरभ जाधव या संशयितांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तिघांकडून दोन लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, नितीन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.