मलकापुरात भाजी मंडईसाठी चार ठिकाणे निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:56+5:302021-04-19T04:36:56+5:30
मलकापूर : मलकापुरातील भाजी मंडईचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न रविवारी निकाली निघाला. पालिकेने भाजी मंडईला ३२० विक्रेत्यांसाठी चार ...
मलकापूर : मलकापुरातील भाजी मंडईचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न रविवारी निकाली निघाला. पालिकेने भाजी मंडईला ३२० विक्रेत्यांसाठी चार ठिकाणे निश्चित केली आहेत. शहरातील विविध विभागांत ठरवून दिलेल्या जागेतच बसा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी दिला आहे.
मलकापूर शहरातील भाजी मांडई हा विषय अनेक वर्षांपासून वादाचा बनला होता. कायम रस्त्यांवर व खासगी जागेतच मंडई भरत आहे. या विषयावर विविध संघटना व व्यावसायिकांनी आणि लगतच्या गाळाधारकांनी अंदोलन व उपोषणही केले. नेहमीच तहसीलदार व पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वारंवार या वादावर पडदा टाकण्याचे काम केले होते. ही बाब विचारात घेऊन नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व नगरसेवकांनी आरक्षित जागेतील नवीन भाजी मंडई विकसित करण्यासाठी पाठपुरावा केला.
येथील अहिल्यानगरलगतची जागा वाटाघाटीने ताब्यात घेऊन प्राथमिक आराखडा विकसित केला. पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासह अधिकाऱ्यांनीही तातडीने या ठिकाणी प्राथमिक सुविधा देण्यासाठी गतीने हालचाली केल्या. या सर्वांच्या प्रयत्नामुळे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या नवीन भाजी मंडईचे उद्घाटन करण्यात आले होते. या शेतकरी भाजी मंडईला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी भाजी मंडई, असे नाव देण्यात आले. मात्र, पुन्हा आगाशिवनगर व जखिणवाडी रस्त्यांवरच भाजी मंडई भरत होती.
मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शहरात चार ठिकाणी मंडई भरवण्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी रविवारी करण्यात आली. त्यामुळे मलकापुरातील भाजी मंडईमुळे होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
(चौकट)
३२० विक्रेत्यांची व्यवस्था
नवीन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी भाजी मंडई ८५, जुनी शिंगण यांच्या खासगी जागेत ७५, कृष्णा रुग्णालय उत्तरेकडील भिंतीलगत सरिताबझार गेट ते दिवटे यांच्या घरापर्यंत १०५ व बागाल वस्ती उत्तरेकडील रो हाऊससमोरील अरुण जाधव यांच्या खासगी जागेत ५५ विक्रेते अशी ३२० विक्रेत्यांची चार ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
(कोट)
मलकापूर शहराचा विस्तार मोठा आहे. एकाच ठिकाणी व रस्त्यांवर भाजी विक्रेते व ग्राहकांची गर्दी होत होती. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न निकाली काढला आहे. विक्रेत्यांनीही ठरवून दिलेल्या जागेतच बसावे व नागरिकांनीही आपल्या घरापासून जवळ असलेल्या भाजी मंडईतच खरेदीसाठी जाऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
- राहुल मर्ढेकर, मुख्याधिकारी