साताऱ्यात पाच हजार प्रवाशांपुढे चार पोलिस ठरताहेत भारी!, मध्यवर्ती बसस्थानक ठरतंय चोरीमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:25 PM2022-11-21T12:25:01+5:302022-11-21T12:25:33+5:30
लोकवर्गणीतून बसवले चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे
जगदीश कोष्टी
सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज शेकडो गाड्यांची वर्दळ असते. या माध्यमातून दररोज सरासरी पाच हजार तरी प्रवासी ये-जा करत असतात. वेगवेगळ्या गावातील, प्रांतातील लोक एकत्र येणार म्हटल्यावर गुन्हे घडण्याची दाट शक्यता असते. पण साताऱ्यात पाच हजार प्रवाशांपुढे चार पोलिस भारी पडत आहेत. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानक चोरीमुक्त बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे आणि कोल्हापूर या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी सातारा आहे. त्याचप्रमाणे कोकण, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून अहमदनगर, बारामतीकडे जाण्यासाठी सातारामार्गेच जावे लागते. सातारा जिल्ह्यातच जागतिक दर्जाचे महाबळेश्वर, पाचगणी थंड हवेचे ठिकाण, जागतिक वारसास्थळात नोंद झालेले कास पुष्पपठार, किल्ले प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड हे किल्ले गटकोट आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून पर्यटक सातारा जिल्ह्यात येत असतात. त्याचप्रमाणे मांढरगडावरची काळूबाई, औंधची यमाई, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, पुसेगावची सेवागिरी, म्हसवडची सिद्धनाथ, पालीचा खंडोबा आदी ठिकाणी मोठ्या यात्रा भरत असतात. यासाठी राज्यासह कर्नाटकातून भाविक येत असतात.
अनेक कारणाने महत्त्वपूर्ण असलेले सातारा जिल्ह्यातील सातारा मध्यवर्ती बसस्थानक कायमच प्रवाशांनी गजबजलेले असते. दररोज सरासरी चार ते पाच हजार प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे गुन्हेेगारी घडण्याची शक्यता जास्त असते. मात्र सातारा मध्यवर्ती बसस्थानकाची जबाबदारी केवळ चार पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. सहायक फौजदार दत्तात्रय पवार यांच्या नेतृत्वाखाली तीन कर्मचारी अविरत कर्तव्य बजावत असतात. यामध्ये दोन कर्मचारी दिवसा व दोन कर्मचारी रात्री कर्तव्य बजावतात.
शाळा-महाविद्यालय दिवसात ताण
सातारा शहरातील अनेक शाळा-महाविद्यालये नावाजलेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी साताऱ्यात येतात. यामुळे या काळात पोलिसांवर मोठा ताण असतो. मात्र या परिसरात रोडरोमिओगिरी करण्याचे कोणत्या मुलांचे धाडस होत नाही.
लोकवर्गणीतून चोवीस कॅमेरे
सातारा बसस्थानकाचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून सर्वत्र नजर रहावी यासाठी सहायक फौजदार दत्तात्रय पवार यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून चोवीस कॅमेरे बसविले आहेत. पोलीस मदत केंद्रात बसून पोलीस गर्दीवर लक्ष ठेवून असतात. एखाद्या फलाटावर गर्दी झालेली असल्यास तेथे जाऊन मदत केली जाते.
वर्षात केवळ दोन दुचाकी चोरीस
सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून केवळ दोनच दुचाकी चोरीस गेल्या आहेत. त्यांचाही छडा लागला असून, दोघांना पकडले होते. दिवाळीत तर ही संख्या दुपटीने वाढते तरी चोरीच्या घटना टाळण्यात पोलिसांना शंभर टक्के यश आले आहे, अशी माहितीही पवार यांनी दिली.
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात प्रत्येक घडामोडीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे हरवलेले लहान मुले, घरातून पळून आलेले अल्पवयीन मुलं, मुलींना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलेले आहे. - दत्तात्रय पवार, सहायक फौजदार, सातारा बसस्थानक