Satara: नववीच्या मुलांनी काढली विद्यार्थिनीची छेड, कऱ्हाड तालुक्यातील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:33 PM2024-08-22T12:33:01+5:302024-08-22T12:33:37+5:30

चार मुलांविरोधात तक्रार दाखल

Four students studying in class 9 teased a student of class 10 in the school itself in karad satara | Satara: नववीच्या मुलांनी काढली विद्यार्थिनीची छेड, कऱ्हाड तालुक्यातील प्रकार 

Satara: नववीच्या मुलांनी काढली विद्यार्थिनीची छेड, कऱ्हाड तालुक्यातील प्रकार 

कऱ्हाड : तालुक्यातील एका शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी त्याच शाळेत दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या तक्रारीवरून कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली असून अल्पवयीन असल्याने संबंधित मुलांना सातारा येथील बाल न्याय मंडळ येथे समुपदेशनकामी पाठविले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

तक्रारदार अल्पवयीन मुलगी ही एका शाळेत दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता संबंधित मुलगी व तिची मैत्री शाळेसमोरून जात असताना त्याच शाळेतील नववीमध्ये शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुलांनी तिची छेड काढली. त्यानंतर या घटनेची माहिती संबंधित मुलीने शिक्षकांना दिली. तसेच हा प्रकार शिक्षकांनी स्वत: पाहिला होता. हा प्रकार घडण्यापूर्वी गत महिन्यात संबंधित मुलांनी शाळेतून घरी जात असताना पाठीमागून येत जोरजोरात हाका मारून संबंधित मुलीची छेड काढली होती. हा प्रकारही त्या मुलीने शिक्षकांना सांगितला होता, असे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्या मुलांविरोधात तक्रार करण्यात आली ती सर्व मुले अल्पवयीन आहेत. संबंधित गुन्हा साध्या प्रकारातील असून त्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे. महाराष्ट्र राज्य बाल न्याय अधिनियम २०१८ अन्वये याप्रकरणी गुन्हा दाखल न करता स्टेशन डायरी नोंद घेऊन संबंधित मुलांना समुपदेशनसाठी सातारा येथील बालन्याय मंडळात पाठवले जाणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Four students studying in class 9 teased a student of class 10 in the school itself in karad satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.