चार तालुक्यांचं ‘उत्तर’ गुलदस्त्यात

By admin | Published: October 1, 2014 10:12 PM2014-10-01T22:12:44+5:302014-10-02T00:18:29+5:30

कऱ्हाड उत्तर : विरोधकांच्या आक्रमकतेमुळे सत्ताधारी गटाची दमछाक

Four talukas 'answer' gulastastaya | चार तालुक्यांचं ‘उत्तर’ गुलदस्त्यात

चार तालुक्यांचं ‘उत्तर’ गुलदस्त्यात

Next

प्रमोद सुकरे -- कऱ्हाड -गत विधानसभा निवडणुकीवेळी मतदारसंघ पुनर्रचनेत कऱ्हाड उत्तर मतदारसंघात सातारा अन् खटाव तालुक्यांतील काही भाग जोडल्याने या मतदारसंघाचे ‘उत्तर’ शोधणे अवघडच बनले आहे़ गतवेळी अपक्ष उमेदवाराने बाजी मारलेल्या या मतदारसंघात यंदा एकही अपक्ष उमेदवार दिसत नाही़ सात पक्षांचे झेंडे घेऊन सातजण रिंगणात उतरले आहेत़
विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील गतवेळी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडून आले़ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या हातात आपसूकच ‘घड्याळ’ आले; पण आघाडीतील बिघाडीमुळे गेले अनेक वर्षे विधानसभेत हाताचा विसर पडलेल्या काँग्रेसजनांना यंदा आपल्या पक्षाला मतदान करण्याची संधी धैर्यशील कदम यांच्या रूपाने मिळाली आहे़
युती तुटल्याने शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी ‘शिवधनुष्य’ उचलले आहे़ तर हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेल्याने मनोज घोरपडे ‘शिट्टी’ वाजवण्यासाठी सज्ज आहेत़ बसपाचा ‘हत्ती’ घेऊन उदय कांबळे रिंगणात उतरले आहेत, तर मनसेचे ‘रेल्वे इंजिन’ राजू केंजळेंच्या हातात दिले आहे़ या सर्व पार्श्वभूमीवर कऱ्हाड उत्तर मध्ये सात वेगवेगळ्या झेंड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे; पण खरी लढत काँग्रेसचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील व स्वाभिमानीेचे मनोज घोरपडे यांच्यातच होणार, हे निश्चित !
आघाडी आणि महायुतीतील घोळामुळे इथल्या मतदारांचा पुरता गोंधळ उडाला आहे़ अपक्ष जरी कुणी नसले तरी सात पक्षांचे उमेदवार असल्याने नेमकी साथ कोणाला द्यायची ? याचा साऱ्यांना प्रश्न पडला आहे़
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीवेळी पुनर्रचनेत कऱ्हाडसह चौदा गावे दक्षिण विधानसभा मतदारसंघात आली, तर सातारा तालुक्यातील दोन आणि खटाव तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट उत्तरेला जोडण्यात आला़ या नव्या मतदारसंघाचा आवाका तेव्हा नव्या उमेदवारांना आला नाही़ तेव्हा ‘सह्याद्री’चे कार्यक्षेत्र माहीत असणाऱ्या अपक्ष बाळासाहेब पाटलांनी बाजी मारली़
आता गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे़ राष्ट्रवादीत असणाऱ्या धैर्यशील कदमांनी काँग्रेसच्या हातात हात घालून पृथ्वीराज चव्हाण व आनंदराव पाटलांच्या माध्यमातून सुमारे दीडशे कोटींची विकासकामे करत पक्षाला बळकटी
देण्याचे काम केले आहे़ संवादयात्रेच्या माध्यमातून गावागावांत संपर्क साधून गट बांधणी केली आहे़ गत निवडणुकीत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या बरोबरीने असणाऱ्या सातारा तालुक्यातील मनोज घोरपडेंनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हातात घेत उत्तरेवर स्वारीची तयारी केली आहे़ त्यामुळे मनोज घोरपडे अन् धैर्यशील कदम हे दोघेच सत्ताधारी आमदार बाळासाहेब पाटलांची डोकेदुखी बनले आहेत. आघाडी कायम राहिली असती, तर काँग्रेसच्या धैर्यशील यांना एक ‘कदम’ मागे घ्यावे लागले असते, अशी चर्चा होती़ मात्र, आता काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने ‘कदम कदम बढाए जा’ म्हणत त्यांची वाटचाल सुरू आहे़
या प्रमुख तिन्ही उमेदवारांनी रान उठविले असल्याने या निवडणुकीत रंगत चढली आहे. शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांना कऱ्हाड उत्तरमधून उमेदवारी दिली आहे. पक्षाने साताऱ्यातून थेट कऱ्हाडमध्ये त्यांचे पुनर्वसन केले आहे. मूळचे पाटणचे असणारे पाटील किती रान उठविणार, हे पाहण्यासारखे आहे. या उमेदवारांच्या निमित्ताने मतदारसंघात राजू शेट्टी, अजित पवार, उध्दव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही निवडणूक याठिकाणी सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. बाळासाहेब पाटलांच्या अनेक वर्षांच्या सत्तेला शह देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे.
नावपक्ष
धैर्यशील कदम काँग्रेस
बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी
मनोज घोरपडे स्वाभिमानी नरेंद्र पाटील शिवसेना
उदय कांबळे बसपा
प्रकाश कांबळे बविपा
राजू केंजळे मनसे

Web Title: Four talukas 'answer' gulastastaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.