सातारा जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांना टाळा, संपात सुमारे ७ हजार सेविका-मदतनीस सहभागी

By नितीन काळेल | Published: December 4, 2023 07:19 PM2023-12-04T19:19:14+5:302023-12-04T19:34:13+5:30

सातारा : अंगणवाडी सेविकांना महिना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्या, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ...

Four thousand Anganwadis in Satara district the lock, About 7 thousand maids helpers participated in the strike | सातारा जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांना टाळा, संपात सुमारे ७ हजार सेविका-मदतनीस सहभागी

सातारा जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांना टाळा, संपात सुमारे ७ हजार सेविका-मदतनीस सहभागी

सातारा : अंगणवाडी सेविकांना महिना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्या, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात सुमारे ७ हजार सेविका-मदतनीस सहभागी झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे चार हजार अंगणवाड्यांना टाळा लागला आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबर वारंवार आंदोलने करण्यात आली. पण, चर्चा आणि आश्वासनाशिवाय त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे आता राज्यव्यापी संप सुरू करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास सर्वच अंगणवाडी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. या संपाबाबत पाठीमागील आठवड्यात संबंधितांना निवेदन देण्यात आलेले. तर सोमवार हा आंदोलनाचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात विविध संघटनांनी आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये शेकडोच्या संख्येत सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैधानिक असून त्यांना मिळणारा मोबदला वेतनच आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करुन त्या अनुषंगाने वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा. मानधन वाढलेतरी महागाई दुपटीने वाढते. त्यामुळे मानधन कमीच पडते. यासाठी महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी. कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव तयार करुन तो आताच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, महानगर पालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करुन अंगणवाड्यांसाठी ५ हजार ते ८ हजार भाडे मंजूर करावे. आहाराचा ८ रुपये हा दर अत्यल्प आहे. त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याएेवजी वाढत चालले आहे. यासाठी हा दर सर्वसाधारण बालकासाठी १६ आणि अतिकुपोषित बालकासाठी २४ रुपये करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी संप सुरु करण्यात आलेला आहे.

२१ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता नाहीच..

कोरोना संकटाच्या काळात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जीव धोक्यात घालून काम केले होते. यासाठी सेविका आणि मदतनीसांनाही २१ हजार रुपये कोरोना प्रोत्साहन भत्ता द्यावा. तसेच ही रक्कम दंड व्याजासह २३ हजार रुपये प्रत्येकी देण्यात यावी, अशी मागणी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका-सेविका संघाकडून करण्यात आली आहे.

जिल्ह्यात साडे चार हजार अंगणवाड्या..

जिल्ह्यात अंगणवाड्यांची संख्या साडे चार हजारांवर आहे. यामध्ये मोठ्या आणि मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. मोठ्या अंगणवाडीत सेविका आणि मदतनीस ही दोन पदे असतात. तर मिनीला सेविकाच पद असते. या संपात सुमारे ७ हजार सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या आहेत. यामुळे ४ हजारांवर अंगणवाड्या बंद आहेत. सध्या नवीन सुरू झालेल्या अंगणवाडीतीलच कर्मचारी संपात नाहीत, अशी माहिती मिळाली.

Web Title: Four thousand Anganwadis in Satara district the lock, About 7 thousand maids helpers participated in the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.