चार हजारांचा चेक; चाळीस हजार वजा!
By admin | Published: October 26, 2015 11:15 PM2015-10-26T23:15:44+5:302015-10-27T00:20:15+5:30
भुर्इंज येथील प्रकार : चूक कोणाची, याबाबत बँक कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवी
भुर्इंज : सुरक्षेची हमी म्हणून लोक राष्ट्रीयीकृत बँकेत आर्थिक व्यवहार करतात; पण आता अशा बँकांमधील व्यवहारही सुरक्षित राहिले नसल्याचे भुईज येथे घडलेल्या प्रकारावरून सिद्ध झाले आहे. येथील कृष्णा पोळ यांनी एका पार्टीला दिलेला चेक बँकेत भरल्यानंतर बँकेने चार हजारांच्या चेकवर तब्बल चाळीस हजार रुपयांची रक्कम पोळ यांच्या खात्यातून वजा केल्याचा प्रकार उघड झाला आहे.याबाबत माहिती अशी की, भुर्इंज येथील कृष्णा संभाजी पोळ ऊर्फ डिसेंट टेलर यांचे येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. या खात्यावर त्यांनी बँकेकडून चेकबुक घेतले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी खरेदी व्यवहारापोटी एका कंपनीस ४ हजार ३०५ रुपयांचा चेक दिला. संबंधित कंपनीने तो चेक बँकेत भरल्यानंतर प्रत्यक्षात मात्र पोळ यांच्या खात्यावरून या चेकपोटी बँकेने ४१ हजार ३०५ रुपये वजा केले. ही गोष्ट पोळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम ज्यांना चेक दिला होता त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा संबंधित कंपनीने आपल्याला ४ हजार ३०५ रूपयेच मिळल्याचे सांगितले.
पोळ यांनी याबाबत माहिती घेण्यासाठी बँकेच्या भुर्इंज शाखेत संपर्क साधला असता त्यांना दुरुत्तरे देण्यात आली. त्यामुळे ४१ हजारांचाच चेक संबंधित कंपनीला गेल्याचा पोळा यांचा समज झाला.
त्यामुळे संबंधित कंपनी आणि पोळ यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर कंपनीने बँकेचे स्टेटमेंट पोळ यांच्या हातात दिले. त्यामध्ये कंपनीस ४ हजार ३०५ रुपये मिळाल्याचे स्पष्ट झाले.
या गैरसमजाबद्दल पोळ यांना कंपनीची माफीही मागावी लागली. मात्र, खात्यावरून वजा झालेली जादा रक्कम नेमकी गेली कुठे, या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नाही.
पोळ यांनी पुन्हा बँक शाखेशी संपर्क साधला. तेव्हाही त्यांना उलटसुलट उत्तरे देण्यात आली. त्यावर पोळ यांनी कंपनीने दिलेले बँकेचे स्टेटमेंट दाखविल्यानंतर बँकेचे कर्मचारीही हडबडले. हा सगळा गडबड घोटाळा झाल्यानंतर पोळ यांच्या खात्यावर वजा झालेली रक्कम जमा झाली.
दरम्यान, खात्यावरून वजा झालेली रक्कम दरम्यानच्या काळात कोणाच्या खिशात होती, याचा खुलासा अद्याप झाला नाही. बँकेच्या महिला कर्मचारी यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल सातारा शाखेकडे बोट करून जी काही चौकशी करायची आहे, ती तिथे करा, चुकी त्यांची आहे, असे सांगितले. त्यामुळे यात नेमके दोषी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकाराची चौकशी करून बँकेच्या विश्वासार्हतेला तडा घालविणाऱ्यावर व विनाकारण संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पोळ यांनी केली आहे. (प्रतिनिधी)