जलसंधारणाच्या कामासाठी चार गावे एकत्र...
By admin | Published: January 15, 2016 11:03 PM2016-01-15T23:03:07+5:302016-01-16T00:25:10+5:30
माण तालुका : प्रभाकर देशमुख यांच्याकडून पाहणी; दिवडी येथे गुढ्या उभारून स्वागत
म्हसवड : ‘लोकसहभागातून महाराष्ट्राला आदर्श ठरेल, असं जलसंधारणाचं काम चार गावांनी एकत्रित येऊन केले आहे. त्या कामाचे कौतुक करायला मी आलो आहे,’ असे प्रतिपादन जलसंधारण व रोजगार हमी योजनेचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी केले. दरम्यान, दिवडी येथील ग्रामस्थांनी गुढ्या उभारून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
दिवडी, ता. माण येथे चार गाव जलयुक्त शिवार पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पुण्याचे सहसंचालक मृदू संधारण ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, कार्यकारी अभियंता डी. वाय. कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय कृषी अधिकारी कृष्णकांत धुमाळ, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सीमा जगताप, उपविभागीय अभियंता दीपक गायकवाड, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर उपस्थित होते.
सचिव देशमुख म्हणाले,‘लोकसहभाग वाढवून पाणलोटाची कामे करावीत. खोल सलग समतल चरांमुळे परिसरातील सर्व विहिरी जिवंत होतात. कोणीतरी येऊन गाव जलयुक्त करील असे होत नाही. तर ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हे सर्व शक्य होते. सयाजी शिंदे यांच्या मदतीमुळे विविध कामे आकारास आली आहेत. तुमचं कुटुंब उभं करा, गाव उभं करा मग बाकीचं बघा. गावातील प्रत्येक कामात माझं काम म्हणून लक्ष द्या. गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन इर्जिक घाला.’
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी चार गाव जलयुक्त शिवार अभियान आराखड्याचे वाचन करून ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच विविध मुद्द्यांचा आढावा घेत त्यांनी तत्काळ निर्णय घेतले. तसेच या चारही गावांतून कमीत कमी पाचशे मजूर उपलब्ध व्हावेत व त्यांच्या माध्यमातून रोजगार हमीची जास्तीत जास्त कामे व्हावीत,अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुभाष घाडगे-महाराज, चांगदेव सूर्यवंशी, गोडसेवाडीचे अप्पासाहेब कदम, दिवडीचे आनंदराव शिर्के, श्रीरंग जाधव यांनी ग्रामस्थांच्या वतीने मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)
कृषी विभागामार्फत विविध कामांना प्रारंभ
पांढरवाडी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कृषी विभागामार्फत ५० हजार रोपांची रोपवाटिका, विहीर, पाझर तलावातील गाळ काढणे आदी कामांची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. गोडसेवाडी येथे लोकसहभागातून करण्यात आलेली खोल सलग समतल चर, पांढरवाडी येथील पाणंद रस्ता, काळेवाडी येथील नाला बांध दुरुस्ती, गाळ काढणे, खोल सलग समतल चर, दिवडी येथील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण आदी कामांची पाहणी करण्यात आली.