चारभिंतीचा डोंगरही करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:38 AM2021-01-03T04:38:08+5:302021-01-03T04:38:08+5:30

साताऱ्यातील ऐतिहासिक चारभिंत परिसरात हिरवळ असते. त्यामुळे तरुणाई येथे फिरण्यासाठी येत असते. मात्र, काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी वनवा लावला ...

The four-walled mountain also collapsed | चारभिंतीचा डोंगरही करपला

चारभिंतीचा डोंगरही करपला

Next

साताऱ्यातील ऐतिहासिक चारभिंत परिसरात हिरवळ असते. त्यामुळे तरुणाई येथे फिरण्यासाठी येत असते. मात्र, काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी वनवा लावला होता. त्यामुळे तेथील डोंगर करपून गेला आहे. येथे तरुणांचाही यामुळे हिरमोड होत आहे. (छाया : जावेद खान)

०००००

बेसुमार उत्खनन

सातारा : सातारा शहर परिसरात बेसुमार वाळू उत्खनन केले जात आहे. त्यामुळे भविष्यात निसर्गाची मोठ्या प्रमाणावर समस्या उद्भवू शकते. यामुळे डोंगरच्या डोंगर पोखरले जात आहे. हे उत्खनन थांबविण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.

०००००

कोरोनाचा धोका

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसत असली तरी कोरोना धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. विनाकारण गर्दी करण्याचे टाळण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही अनेकजण विनाकारण गर्दी करत आहेत. प्रवास करत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे.

०००००००

रिक्षा वाहतूक धोक्याची

सातारा : साताऱ्यातील नागरिक शहरातील प्रवासासाठी रिक्षाचा आधार घेत आहेत. मात्र, साताऱ्यातील अनेक रिक्षाचालक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना वाहन चालविणे कितपत चांगल्या पद्धतीने जमते याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांना किती अंतरावरचे दिसते हाही प्रश्न निर्माण होत आहे.

००००००००

बोगद्यात कोंडी

सातारा : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणीला आले होते. ते सर्वच शुक्रवारी परतीला लागल्याने पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्यात शुक्रवारी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

०००००००००००००

खड्डमुक्तीमुळे समाधान

वडूज : खटाव तालुक्यातील बहुतांशी मुख्य रस्त्यावरील खड्डे मुजविल्याने चालकांसहीत वाहनधारकांना होणारा शारीरिक व आर्थिक त्रासाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे, तर संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्याने नागरिकांची चांगली सोय झाली आहे.

००००००

लोकसेवा परीक्षेविषयी मोफत कार्यशाळा

पिंपोडे बुद्रुक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांत काही मुद्यांबाबत असलेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी वेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ५ ते ९ जानेवारी या कालावधीत मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

०००००००

रात्रगस्तीची मागणी

सातारा : गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मद्यपान करून वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. हे तरुण पिढीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रात्रगस्त वाढविण्याची मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आहे.

०००००००

तळ्यांतील पाणी दूषित

सातारा : सातारा शहरात पूर्वीपासून पाणीपुरवठ्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी ठिकठिकाणी तळी तयार केली आहेत. मात्र, त्याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे तळ्यांमधील पाणी हिरवे पडले आहे. त्याचा फटका त्यातील माशांना बसत असून ते मृत्युमुखी पडत आहेत.

००००००

टोप्यांचा लूक बदलला

सातारा : साताऱ्यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झालेले आहे, पण गेल्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढल्याने कानटोप्यांना मागणी वाढली होती. बदलत्या काळानुसार ऊबदार लोकरी टोप्यांचा लूकच बदलला आहे. त्यांना तरुणाईंतून मागणी वाढत आहे.

००००००००

डोळ्यांमध्ये धूळ

सातारा : साताऱ्यासह परिसरात डंपरमधून वाळू, मातीची वाहतूक केली जात आहे. त्यावर काहीही झाकून ठेवलेले नसते. वाऱ्यांमुळे ही धूळ उडून येत असते. त्यामुळे संबंधित वाहनांच्या पाठीमागून येत असलेल्या वाहनचालकांच्या डोळ्यात ती जात आहे.

०००००००

राजकीय बैठकांवर भर

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकाचा हंगाम खऱ्या अर्थाने बहरात आला आहे. अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस असल्याने किती अर्ज मागे घेतले जाणार यावर चर्चा रंगायला लागल्या आहेत. गावातील पार, मंदिरांमध्ये याविषयीच चर्चा रंगत आहे.

०००००००००

टोलनाक्यावर वाहनांचालकांची तपासणी

सातारा : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी साताऱ्यातील तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. त्यामुळे अनेक तरुण मद्यपान करून वाहने चालवत असतात. यातून अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहनचालकांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर काही दिवसांपासून कसून तपासणी केली जात आहे.

०००००००००

पत्रपेटीची सोय

सातारा : बदलत्या काळानुसार मोबाईल क्रांती झाली अन् टपाल सेवेचा वापर कमी झाला, पण तरीही साताऱ्यातील टपाल कार्यालयाने मंगळवार तळे परिसरात पत्राची पेटी बसवली आहे. या परिसरात कर्तव्य बजावत असलेले कर्मचारी त्यात टपाल आले काहे पाहत असतात.

००००००

सुरक्षारक्षकाची गरज

सातारा : साताऱ्यातील फुटका तलाव परिसरात आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे.

०००००००००

व्यंकटपुरा परिसरात कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता

सातारा : सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी व्यंकटपुरा पेठेत स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये मंगळवार तळेपासून बहुलेश्वर मंदिर तसेच कृष्णेश्वर गणेशोत्सव पार परिसरात या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. यामध्ये महिलांनी झाडून माती बाजूला केली, तर पुरुष कर्मचाऱ्यांनी खोऱ्याच्या मदतीने खडी, वाळू, दगड-गोटे बाजूला केले. त्यामुळे परिसराचा चेहरामोहराच बदलला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून ही मोहीम अशीच ठेवण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: The four-walled mountain also collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.