चार वर्षांची चिमुकली क्रांती गिरवतेय कीर्तनाचे धडे : बोबड्या बोलातील अभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:59 AM2019-12-03T00:59:39+5:302019-12-03T01:01:25+5:30
बाळासाहेब रोडे । सणबूर : तिचं हे वय खेळण्या बागडण्याचं. सवंगड्यांच्या मागे धावण्याचं अन् खाऊसाठी आई-बाबांकडे हट्ट धरत गालाचा ...
बाळासाहेब रोडे ।
सणबूर : तिचं हे वय खेळण्या बागडण्याचं. सवंगड्यांच्या मागे धावण्याचं अन् खाऊसाठी आई-बाबांकडे हट्ट धरत गालाचा फुगा करून रुसण्या फुगण्याचं; पण या वयात ती गळ्यात विणा अडकवून कीर्तनाचे धडे गिरवतेय. आणि आपल्या बोबड्या बोलात अभंग, ओव्या गात त्याचा अर्थही समजावून देण्याचा प्रयत्न करतेय.
ढेबेवाडी विभागातील साबळेवाडी-सागाव येथील अवघ्या चार वर्षांची क्रांती साबळे ही चिमुकली कीर्तनकार म्हणून परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे. साबळेवाडीतील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कीर्तनकार अभिजित साबळे यांची ही कन्या. तिचे आजोबा आनंद साबळे यांच्याकडून या कुटुंबाला मिळालेला समाजप्रबोधनाचा वारसा आजअखेर त्यांनी कायम जपला आहे. आनंद साबळे यांनी शाहिरी, स्वरचित काव्ये, नाटके व बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमांद्वारे तब्बल ४० वर्षे ग्रामीण भागात समाज प्रबोधनाची चळवळ अखंड सुरू ठेवली होती. एका दुर्दैवी घटनेत त्यांचा आवाज गेल्यानंतरही न खचता मोठ्या धिराने त्यावर मात करत आजही ते हा वारसा पुढे नेताना दिसत आहेत. अध्यात्म आणि प्रबोधनाची बैठक असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या क्रांतीला वडील आणि आजोबांकडून मिळत असलेल्या बाळकडूतून उद्याचा एक चांगला कीर्तनकार घडताना दिसत आहे.
गळ्यात विणा अडकवून आपल्या बोबड्या बोलामध्ये अभंग, ओव्या गात त्याचा अर्थही समजावून देण्याचा प्रयत्न करणारी क्रांती सध्या येथे कौतुकाचा विषय ठरली आहे. क्रांती गावातील अंगणवाडीत शिकते. दररोज रात्री घरी ती हरिपाठही करते. सध्या घरोघरी चिमुकली मुले मोबाईल गेममध्ये व्यस्त दिसत असताना कीर्तनकार बनण्याच्या दिशेने क्रांती टाकत असलेली पावले येथे कौतुकाचा विषय बनला आहे.
- अभंग, ओव्या तोंडपाठ कशा..?
एवढ्या लहान वयात मुलीच्या आठवणीत कीर्तनातील अभंग ओव्या कशा राहत असतील, याचीच सर्वत्र चर्चा आहे. आजोबा आणि वडीलांनी लहान वयातच मुलीला अशा प्रकारचे प्रबोधन करून तिची स्मरणशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने चालवलेले प्रयत्न प्रेरणादायी असेच आहेत.
- गल्लीपासून दिल्लीपर्यंतची माहिती
तिची स्मरणशक्तीही चकीत करणारी आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विविध नेते मंडळींची तसेच सामान्य ज्ञानावर आधारित शंभरहून अधिक प्रश्नांची उत्तरे तिच्या तोंडपाठ आहेत. गावातील प्रत्येकजण जसा तिला ओळखतो, तशीच तीही प्रत्येकाला नावानिशी ओळखते. अनेक कार्यक्रमांतून क्रांतीने आपल्या या स्मरणशक्तीची झलकही दाखवून दिली आहे.
मुलांना त्यांच्या भोवतालचेच वातावरण घडवत असते. याचा अनुभव आम्ही क्रांतीच्या बाबतीत घेत आहोत. तिच्या रुपाने भविष्यात एक चांगली कीर्तनकार समाजासमोर येईल.
- आनंद साबळे, क्रांतीचे आजोबा