चौघांचा गेला जीव.. ‘सिव्हिल’ला येईना कीव !
By admin | Published: January 19, 2017 11:17 PM2017-01-19T23:17:52+5:302017-01-19T23:17:52+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप; सखोल चौकशी करुन कारवाईची मागणी
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील उपचारपद्धती नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. सिव्हिलमध्ये उपचार घेणाऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत, अशी ओरड होत असते; परंतु याही पलीकडे कळस म्हणजे गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या चार अनोळखी व्यक्तींवर योग्य उपचार न झाल्याने त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागल्याचे धक्कादायक वास्तव एका सामाजिक कार्यकर्त्याने उघडकीस आणले आहे. संबंधित रुग्णांना पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच चौघांचा बळी गेल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेमधून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. बऱ्याचदा अशा व्यक्तींची ओळख पटत नसते. त्यांच्या नातेवाइकांचा थांगपत्ता लवकर लागत नसल्यामुळे अशा रुग्णांवर योग्य आणि वेळेत उपचार होणे गरजेचे असते. मात्र, ‘सिव्हिल’मध्ये अनोळखी व्यक्तींवर उपचार करण्यासाठी वालीच नसल्याने रुग्णांचे पटापटा जीव जात असल्याचे समोर आले आहे. बोरगाव हद्दीमध्ये दि. १० डिसेंबरला एका ३५ वर्षीय युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती.
१०८ रुग्णवाहिकेने त्याला सिव्हिलमध्ये आणण्यात आले. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला पुणे येथे नेण्याचा सल्ला केवळ केसपेपरवर लिहिला गेला. नेहमी जसे उपचार केले जातात. तसे त्याच्यावर वॉर्डामध्ये उपचार सुरू होते.
सिव्हिलमधील कोणीही त्याच्याकडे फिरकले नाही. परिणामी तब्बल एक महिन्यानंतर त्या युवकाचा बुधवार, दि. १८ रोजी सिव्हिलमध्येच मृत्यू झाला. ना त्याच्या वारसाचा ना त्याच्यावर काय उपचार केलेल्याचा कोणालाच थांगपत्ता नाही.
आता त्या युवकाला बेवारस म्हणून दफन केले जाईल. मात्र, त्याच्या उपचारपद्धतीवर जो हलगर्जीपणा झाला. त्यामुळे त्याचा जीव गेला. त्याला कोण जबाबदार, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांनी उपस्थित केलाय. एवढेच नव्हे तर ३० व ४० वर्षीय दोन महिला आणि एका ५० वर्षीय अनोळखी पुरुषाचाही मृत्यू अशाच प्रकारे झाला आहे. या रुग्णांना तत्काळ
वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे प्राण गमवावे लागले असल्याचा आरोपही बोडके यांनी केला आहे.
दरम्यान, अनोखळी व्यक्तींचा असा नाहक जीव गेल्याने सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके आणि त्यांची पत्नी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी यापुढे अशी चूक होणार नाही, अशी त्यांच्यासमोर कबुली दिली. मात्र ज्यांचा जीव गेलाय, त्याचे काय, याला जबाबदार कोण? असा प्रश्न बोडके यांनी त्यांच्यासमोर उपस्थित
केला. मात्र यावर त्यांनी चकार शब्द काढला नाही. त्यामुळे बोडके दाम्पत्याने संबंधितांवर कारवाईसाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना बोडके यांनी निवेदन दिले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही बोडके यांनी केली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात रोज पाचशे ते सहाशे रुग्ण येत असतात. अनेकांना वेळ संपली म्हणून घरचा रस्ता दाखविला जातो. मात्र माणुसकीच्या नात्यातून रुग्णांना आपुलकीची वागणूक दिली जात नाही. असा आरोपही करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
‘सिव्हिल’चे वर्कर भलत्याच कामात व्यस्त !
जिल्हा शासकीय रुग्णालयात तीन अधिकृत तर सहा कंत्राटी सोशल वर्कर आहेत. रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब व अनोळखी व्यक्तींवर योग्य उपचार होतात की नाही, यांच्या देखरेखीची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र, अशा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना वेळ नाही म्हणे. कारण सिव्हिलने त्यांना भलत्याच कामात व्यस्त ठेवले आहे. मात्र, त्यांना पगार मिळतो तो सोशल वर्कर म्हणूनच.
जीव वाचावा म्हणून रुग्णवाहिकेची धडपड !
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रात्री अपरात्री फोन आल्यानंतर लगेच ही रुग्णवाहिका सेवेच सज्ज असते. रुग्णाचा जीव वाचावा म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून वेगाने ही रुग्णावाहिका धावत असते. मात्र असे असताना रुग्णांवर मात्र वेळेत उपचार केले जात नाहीत. परिणामी त्याचा जीव जातो.