फौजींनो.. सीमेवर फी भरता, येथे नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:28 AM2019-02-25T00:28:06+5:302019-02-25T00:28:11+5:30
राजीव पिसाळ। लोकमत न्यूज नेटवर्क पुसेसावळी : देशाची इंचन् इंच जमीन सुरक्षित राहावी, यासाठी भारतीय जवान देशावर रात्रंदिवस जीवाची ...
राजीव पिसाळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेसावळी : देशाची इंचन् इंच जमीन सुरक्षित राहावी, यासाठी भारतीय जवान देशावर रात्रंदिवस जीवाची बाजी लावत असतात. त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, याची जाण ठेवून पुसेसावळीतील एका डॉक्टरने जवानांसाठी मोफत आरोग्य सेवा देऊ केली आहे. ‘फौजी मित्रांनो.. आपण आपली फी देऊ नये. तुम्ही तुमची फी रोज बॉर्डरवर देत असता,’ असा फलकच लावला आहे.
पुसेसावळीसारख्या ग्रामीण भागातील सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ. प्रतापराव जगदाळे यांच्या श्रद्धा रुग्णालयात लावलेला फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
काश्मिरातील पुलवामा येथे जवानांच्या वाहनांवर आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आले. या घटनेमुळे आपल्या संपूर्ण देशावर दु:खाचा डोंगर कोसळला. आपापल्या भागात कँडल मार्च काढून जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आल्या. तसेच अनेक भारतीय आपल्या जवानांसाठी व शहीद झालेल्या कुटुंबीयासाठी आपापल्या परीने योगदान देत आहेत. त्यातून देशसेवा करण्याचा मनापासून प्रयत्न करत आहेत.
असेच योगदान पुसेसावळी या ग्रामीण भागातील सामाजिक बांधिलकीची जान असणारे डॉ. प्रतापराव जगदाळे यांनी त्यांच्या श्रद्धा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक जवानाच्या तपासणीसाठी ‘फौजी मित्र हो, कृपया आपण आपली फी देऊ नये.
तुम्ही तुमची फी रोज बॉर्डरवर देत असतात.’ अशा प्रकारचा फलक त्यांनी आपल्या श्रद्धा रुग्णालयात लावलेला आहे. त्याचप्रमाणे ते आपल्या दवाखान्यात येणाºया जवानांना मोफत उपचार करत आहेत. त्यामुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. याप्रमाणे ते सामाजिक बांधिलकीचे काम करत आहेत. तरी त्यांच्या या निर्णयामुळे पुसेसावळीसह परिसरातून या उपक्रमाबद्दल कौतुक केले जात आहे.
सीमेवरून कौतुक
जवानांसाठी काहीतरी चांगले करण्याबाबत दीड वर्षापासून नियोजन चालले होते. ते यावर्षी ११ फेब्रुवारीपासून अंमलात आणले आहे. आतापर्यंत ३ ते ४ फौजींना मोफत उपचार केले. परिसरातील अनेक जवानांनी सीमेवरून फोन करून उपक्रमाचे कौतुक केले आहे.