शेरेत दरवळणार फुलांचा सुगंध, माऊलीचा उपक्रम : गावभर तीनशे फुलझाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 03:55 PM2020-11-12T15:55:44+5:302020-11-12T15:57:24+5:30
karad, road, tree, sataranews शेरे, ता. कऱ्हाड येथे गावात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा १ हजार ८०० रोपांचे रोपण व नदीकाठावर चारशे झाडांच्या यशस्वी वृक्षारोपणानंतर शेरे, ता. कऱ्हाड येथील माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानने गावामध्ये फुलांचा सुगंध दरवळत ठेवण्यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. प्रतिष्ठानकडून तीनशे फुलझाडांचे नुकतेच रोपण करण्यात आले आहे.
वडगाव हवेली : शेरे, ता. कऱ्हाड येथे गावात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा १ हजार ८०० रोपांचे रोपण व नदीकाठावर चारशे झाडांच्या यशस्वी वृक्षारोपणानंतर शेरे, ता. कऱ्हाड येथील माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानने गावामध्ये फुलांचा सुगंध दरवळत ठेवण्यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. प्रतिष्ठानकडून तीनशे फुलझाडांचे नुकतेच रोपण करण्यात आले आहे.
शेरे गावातील गणेश मंडळांना रोपे उपलब्ध करून देऊन त्यांची जबाबदारी त्या मंडळांकडे देण्यात आली आहे. फूलझाडे फुलल्यानंतर गावचा परिसर बहरणार असल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेली तीन वर्षे हे प्रतिष्ठान ग्रामविकासासाठी सर्वतोपरी कार्यरत आहे. प्रतिष्ठानने गावात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा सुमारे अठराशे झाडे लावून ती जगवली आहेत. वृक्षारोपणासह अल्पावधित अनेकविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम यशस्वी केले आहेत. त्याचबरोबर अनेक गरीब व गरजूंना मदतीचा हातही दिला आहे.
कोरोनाच्या महामारीमध्ये आडके वस्तीवर वृद्ध महिलेची झोपडी जळाली. या घटनेनंतर तत्काळ प्रतिष्ठानने मदतीसाठी आवाहन केल्यानंतर तब्बल ७५ ते ८० हजार रुपयांची मदत गोळा झाली. त्यामधून जळालेले घर नव्याने उभारून आपले कार्य प्रतिष्ठानेन अधोरेखित केले. याच कालावधीत वाया जाणाऱ्या वेळेचा सदुपयोग करत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दररोज सकाळी व सायंकाळी श्रमदानातून कृष्णा नदीकाठावरील बाभळी निर्मूलनाचे महत्त्वपूर्ण काम केले. यातून मोकळ्या झालेल्या तीन एकरावर चारशे दुर्मीळ फळझाडांचे रोपण केले आहे.
सध्या गावात येणाऱ्या रस्त्यांच्या बाजूची अठराशे झाडे व नदीकाठी लावलेली सर्व झाडे जगली आहेत. प्रतिष्ठानने आता नवीन पाऊल उचलत गावामध्ये फूलझाडांचे रोपण करण्याची मोहीम आखली. गाव तसेच शेरे स्टेशन व गावठाण भागातील सात गणेश मंडळांच्या मदतीने फूलझाडांची लागवड केली. सुवासिक व शोभेच्या फुलझाडे रोपण मोहिमेवेळी गावातील ग्रामस्थांसह महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.