‘लाडकी बहीण’चा गैरफायदा; दाम्पत्य वडूज पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2024 11:03 PM2024-09-03T23:03:53+5:302024-09-03T23:04:31+5:30

विविध पेहरावांत सेल्फी घेऊन फोटो अपलोड; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

fraud in ladki bahin yojana the couple is in police custody | ‘लाडकी बहीण’चा गैरफायदा; दाम्पत्य वडूज पोलिसांच्या ताब्यात

‘लाडकी बहीण’चा गैरफायदा; दाम्पत्य वडूज पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, वडूज : राज्यभरातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतानाच खटाव तालुक्यात गैरकारभार झाल्याचे निष्पन्न झाले. या योजनेतील पैसे घेण्यासाठी महिलेने विविध पेहरावांत सेल्फी घेऊन फोटो अपलोड केले. अशा प्रकारे २९ अर्ज भरले असल्याचे समारे आल्यानंतर वडूज पोलिसांनी निमसोड, ता. खटाव येथील गणेश संजय घाडगे (वय ३०) व त्याची पत्नी प्रतीक्षा (२२) या दाम्पत्याला रात्री ताब्यात घेतले.

लाडकी बहीण या योजनेमध्ये गैरकारभार झाल्याची तक्रार पनवेलमधील भाजपचे माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी २ सप्टेंबर रोजी पनवेल तहसीलदारांकडे केली होती. खारघरमधील एका महिलेचे आधार कार्ड वापरून साताऱ्यात ३० अर्ज भरले असून, यातील काही खात्यांमध्ये पैसेही जमा झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावला.

निमसोड येथील बारावी शिक्षण घेतलेला गणेश घाडगे हा भिवंडी येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याची पत्नी प्रतीक्षा घाडगे हिने माहेरचे नाव प्रतीक्षा पोपट जाधव या आधार कार्डचा वापर केला. तसेच तिच्या मोबाइल नंबरवरून बहीण कोमल संजय पिसाळ, मावशी सुनंदा संजय पिसाळ (रा. चितळी, ता. खटाव), मंगल संजय घाडगे (रा. निमसोड), पूजा बाळासाे जाधव (रा. गुरसाळे) यांची आधार कार्डे घेऊन, गुगलला आधारच्या वेबसाईटवर सर्च करून पंचवीस आधार नंबर सर्च केले. हे आधार नंबर तिने अर्जामध्ये भरले. त्यानंतर प्रतीक्षा जाधव हिने विविध पेहरावांत सेल्फी घेऊन अधिकचा लाभ मिळविण्यासाठी वेबसाइटवर फोटो अपलोड केले. या अपलोड केलेल्या अर्जाला वडूजमधील माणदेशी महिला सहकारी बॅंकेचे खाते लिंक केले. अपलोड केलेल्या तीस अर्जांपैकी प्रतीक्षाच्या नावे २९ ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये जमा झाले. या घटनेची बालविकास प्रकल्प अधिकारी एस. एस. खाबडे यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पाेलिस निरीक्षक घनशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

‘त्यांनी’ नातेवाइकांनाही गोवले...

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी नातेवाइकांच्या आधार कार्डचा वापर केला. त्यामुळे नातेवाइकांनाही त्यांनी यात नाहक गोवले. अशा प्रकारे आणखी कुठे त्यांनी फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: fraud in ladki bahin yojana the couple is in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.