रक्कम दामदुप्पट करून देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:33+5:302021-02-05T09:05:33+5:30
लोणंद : येथील रयल वेज मार्केटिंग बिजनेस या कंपनीत पैशाला ज्यादा व्याज व दामदुप्पट मिळावे म्हणून सातारा येथील सूर्यवंशी ...
लोणंद : येथील रयल वेज मार्केटिंग बिजनेस या कंपनीत पैशाला ज्यादा व्याज व दामदुप्पट मिळावे म्हणून सातारा येथील सूर्यवंशी कॉलनी करंजे तर्फ सातारा येथे राहणाऱ्या सीमा सुनील धनावडे यांनी टप्प्याटप्प्याने २ लाख ७० हजार रुपये भरले. त्यापैकी केवळ २६ हजार रुपये त्यांना परत केले आहेत. २ लाख ४४ हजार रुपये देण्यास कंपनीकडून टाळाटाळ होत आहे, याबाबत धनावडे यांनी फिर्याद दिली. फसवणूकप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये कंपनीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सीमा धनावडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पाच वर्षांपासून माउली बचत गट आहे. त्यामध्ये उज्ज्वला महादेव निकम (रा. एमआयडीसी अमरलक्ष्मी बसस्टॉप कोडोली सातारा) या सभासद होत्या. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी बोलावून सांगितले की ‘मी लोणंदच्या रयल वेज मार्केटिंग बिजनेस या कंपनीत २ लाख १७ हजार रुपये भरले. त्याचे दररोज १ टक्के व्याजदराने मला ४० हजार रुपये मिळाले. कंपनीत पैसे बुडत नाहीत. तुम्हीही गुंतवणूक करा.’ त्यानंतर चौघेजण घरी आले. त्यांनी ‘पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. मी पैसे भरले नाहीत. सप्टेबरमध्ये त्यांनी मला वारंवार विनवण्या केल्याने उज्ज्वला निकम, विशाल वाघ हे माझ्या घरी आल्याने सुरुवातीस ५० हजार रुपये रोख दिले. त्यानंतर ८ आक्टोबर रोजी १ लाख ६० हजार रुपये रक्कम उज्ज्वला निकम, विशाल वाघ यांच्याकडेच दिली. त्यानंतर परत ६० हजार रोख रक्कम उज्ज्वला निकम, विशाल वाघ यांचेकडेच दिली. त्यानंतर माझे पती सुनील धनावडे यांचे जनसेवा बँक सातारा येथील बचत खात्यावर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये १० हजार ८०० रुपये, माझ्या जिल्हा बँकेच्या खात्यावर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये १४ हजार ८५० रुपये, वडील रघुनाथ जगन्नाथ डिगे याच्या बॅक खात्यावर ६ हजार २०० रुपये जमा झाले.
त्यानंतर कंपनीने पैसे दिले नाहीत. कंपनीमध्ये अडचण सुरू आहे. असे सांगण्यात येत होते. त्यानंतर लोणंदमध्ये रयल वेज मार्केटिंग बिजनेसचे अध्यक्ष विठ्ठल अंकुश कोळपे, अनिल अंकुश कोळपे (रा. कुसूर, ता. फलटण) व संदीप सोपान येळे (रा पारोडी, ता. शिरुर, जि.पुणे) यांना भेटून ‘तुमच्याकडून २ लाख ४४ हजार रुपये येणे बाकी आहेत,’ असे सांगितले. यावर त्यांनी ‘तुम्हाला पूर्ण रकमेचा धनादेश देतो,’ असे म्हणाले. त्यांना रोख रक्कम द्या, असे म्हणाले परंतु, त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या लोणंद शाखेचा धनादेश दिला. मात्र दिलेला धनादेश वटला नाही. यावरून त्यांनी लोकांची फसवणूक केल्याची खात्री झाली. कंपनीचे चेअरमन विठ्ठल कोळपे, अनिल कोळपे, व उपाध्यक्ष संदीप येळे यांनी फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी तपास करत आहेत.