Satara: माणच्या उद्योजकाची १५ कोटींची फसवणूक, पुण्यातील दहा व्यावसायिकांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 04:19 PM2023-09-21T16:19:06+5:302023-09-21T16:19:56+5:30
न्यायालयाच्या आदेशानंतर दखल
म्हसवड : आयात- निर्यातचा व्यवसाय करणाऱ्या माण तालुक्यातील एका उद्योजकाची पुण्यातील एका व्यावसायिकासह दहा जणांनी तब्बल १५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत उद्योजक दशरथ मच्छिंद्र कोकरे (वय ४०, रा. बनगरवाडी, ता. माण, सातारा) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मनोज सुरेश लुंकड, सुरेखा सुरेश लुंकड, दर्शना मनोज लुंकड (सर्व रा. मार्केट यार्ड, स्वारगेट, पुणे), अनिल चंद्रभान बन्साली, अल्पेश अनिल बन्साली (बिळेवाडी, पुणे), नरेंद्र प्रकाश धोका, सोनल नरेंद्र धोका (रा.को. ऑप. सोसायटी रोहन निलय, पुणे), निजामुद्दीन शेख (कोपरखैराणी, नवी मुंबई), राजश्री रवींद्र कुक्कडवाल (रा. महालक्ष्मी काॅलनी, अकोले), विजय नवलखा (रा. बिळेवाडी, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक दशरथ कोकरे यांचा सीमा शुल्क विभागाचा जप्त केलेला माल सरकारकडून घेऊन त्याचा कर भरून तो माल खुल्या बाजारात विकण्याचा व्यवसाय आहे, तसेच आयात- निर्यात करण्याचाही व्यवसाय आहे. वरील सर्व संशयित एकमेकांचे नातेवाईक व मनोज लुंकड यांचे कर्मचारी आहेत. मनोज लुंकडचे पुण्यात अनेक व्यवसाय आहेत. उद्योजक कोकरे यांची लुंकड यांच्याशी ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये पैशाचे, तसेच जमीन विक्रीचे व्यवहार झाले. उद्योजक दशरथ कोकरे यांची २६ एकर जमीन हडप करण्यासाठी संशयितांनी पुणे येथील बँकेत बोगस खाते उघडून त्या खात्यावर दस्ताएवढ्या रकमा जमा करून त्या रकमा संशयितांनीच परस्पर काढून घेतल्या.
यातून संशयितांनी परस्पर रकमा एकमेकांच्या खात्यावर वर्ग केल्या. मात्र, उद्योजक कोकरे यांना त्यांनी अंधारात ठेवून पैसे हडपले. या प्रकारानंतर कोकरे यांनी म्हसवड न्यायालयात वरील संशयितांविरोधात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर वरील संशयितांविरोधात फसवणूक, खंडणी यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ हे अधिक तपास करीत आहेत.
संशयितांकडून खंडणीचीही मागणी
या प्रकरणामध्ये कोकरे यांच्या म्हणण्यानुसार संशयितांनी १५ कोटींचा माल खरेदी केला, तर २६ एकर जमीन स्वत:च्या नावावर करून हडपली. ही जमीन परत नावावर करून देण्याचे कबूल केले होते. पैसे परत मागितले असता दमदाटी केल्याचे व खंडणीही मागितल्याचे कोकरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.