Satara: तमाशाच्या नफ्यात भागीदारी देतो सांगून २६ लाखांना गंडा, तिघांवर गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: November 30, 2023 04:15 PM2023-11-30T16:15:04+5:302023-11-30T16:16:37+5:30
पैसे परत मागितले असता खासगी सावकारी व अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली
सातारा : तमाशाच्या नफ्यात पंचवीस ते तीस टक्के भागीदारी देतो, असे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल २६ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. दत्तात्रय नाना सोनावले (वय ५०), सूर्यकांत दत्तात्रय सोनावले (२७), चंद्रकांत दत्तात्रय सोनावले (२४, रा. अतीत, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रसाद साहेबराव चव्हाण (वय ३२, रा. अतीत, ता. सातारा) यांचा कराटे क्लासेसचा व्यवसाय आहे. वरील संशयितांनी त्यांना काही रक्कम उसनी द्या. आम्ही तुम्हाला तमाशाच्या उत्पन्नातून होणाऱ्या नफ्यात पंचवीस ते तीस टक्के भागीदारी देतो, असे सांगितले. विश्वास संपादन करून वेळोवेळी २६ लाख २५ हजार ३८० रुपयांची रक्कम दत्तात्रय सोनावले यांच्या बॅंक खात्यावर प्रसाद चव्हाण यांनी नेट बॅंकिंगद्वारे पाठविली.
मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी पैसे परत मागितले असता खासगी सावकारी व अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. तसेच ६ नोव्हेंबर रोजी रात्री साठेआठ वाजता त्यांच्या घरी पैसे मागण्यास गेले असता संशयित तिघांनी मिळून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. हवालदार चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.