जमीन खरेदीच्या नावाखाली २६ लाखांची फसवणूक, शिंगणापूरच्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 04:30 PM2022-04-11T16:30:59+5:302022-04-11T16:31:20+5:30
फलटण : फलटण शहरालगत कोळकी येथे जमीन खरेदी करून देतो, असे सांगून एका दाम्पत्याने कोळकी येथील एकाची सुमारे २६ ...
फलटण : फलटण शहरालगत कोळकी येथे जमीन खरेदी करून देतो, असे सांगून एका दाम्पत्याने कोळकी येथील एकाची सुमारे २६ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, दि. १५ ऑगस्ट २०२० पासून बापू नामदेव शिंगाडे व त्यांची पत्नी रूपाली शिंगाडे (दोघे रा. शिंगणापूर, ता. माण, जि. सातारा) यांनी ‘कोळकी येथील जमीन सर्व्हे नं. ५७/४ मधील ४.५ गुंठे जमीन खरेदी स्वस्तात करून देतो,’ असे सांगून अभिजित जरिचंद सुरवसे (रा. नरसोबानगर, कोळकी, ता. फलटण) यांचा विश्वास संपादन केला. वेगवेगळी कारणे सांगून शिंगाडे दाम्पत्याने तब्बल २६ लाख २० हजार रुपये जमीन खरेदीकरिता व इतर कारणाकरिता स्विकारून जमीन खरेदी करून देण्यास व पैसे परत करण्यास टाळाटाळ केली होती.
जमिनीचा व्यवहार ठरल्यानंतरच्या कालावधीत जमिनीचा साठे करार सुरवसे यांच्या नावे करण्याचे ठरलेले असतानाही शिंगाडे याने साठेकरार हा पत्नी व स्वत:च्या नावे करून घेतला होता. जमीन खरेदी व्यवहाराकरिता वेळोवेळी दिलेले एकूण सुमारे २६ लाख २० हजार रुपये परत करण्यास सांगितले असता त्यावेळीही बापू शिंगाडे पैसे परत करतो, असे सांगून चालढकल करू लागला. त्यामुळे सुरवसे यांना जमीन खरेदीसाठी दिलेल्या पैशांबाबत विश्वासघात करून फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली.
त्यामुळे शिंगाडे दाम्पत्याच्या विरोधात सुरवसे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण कार्यालयात तक्रारी अर्ज केला होता. तक्रारी अर्जाचे चौकशीवेळी बापू शिंगाडे याने दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजीपर्यंत मुदत मागून पूर्ण पैसे परत करतो, असे लिहून दिले होते. परंतु तारीख संपूनही चालढकल करून पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अभिजित जरिचंद सुरवसे यांनी बापू नामदेव शिंगाडे व त्यांची पत्नी रूपाली शिंगाडे यांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.