आळंदी-पंढरपूर महामार्गाच्या कामात ठेकेदाराकडून शासन व जनतेची फसवणूक, अधिकारी काम पाहतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 05:43 PM2023-01-03T17:43:38+5:302023-01-03T17:44:04+5:30
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या फलटण तालुक्यातील रस्त्याचे काम सुरू
जिंती : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या फलटण तालुक्यातील रस्त्याचे काम सुरू असताना मुरुमीकरण करताना ठेकेदाराकडून चक्क लाल मातीचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठेकेदाराकडून शासन व जनतेची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाने आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गासाठी कोट्यवधीचा निधी दिला असताना ठेकेदाराकडून मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून मुरुम ऐवजी लालमातीचा वापर केला जात आहे. संबंधित भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण वारजे पुणे येथील अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाचा दर्जा वेळच्या वेळी तपासणे आवश्यक आहे; मात्र रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे चाललेले काम हे अधिकारी पाहतात की नाही या विषयी शंका उत्पन्न केल्या जात आहेत.
संबंधित ठेकेदाराने प्रशासकीय विभाग यांना हाताशी धरून फलटण तालुक्यात मनमानी नियमबाह्य बेकायदेशीररित्या महामार्गाचे काम सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. महामार्गाच्या संबंधित अनेक कामात त्रुटी ठेवत रस्त्याच्या कामाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला जात असून विकास हवा पण ठेकेदार आवरा अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
फलटण तालुक्यातील पालखी मार्गाचे जे काम सुरू आहे त्या महामार्गावरील रस्त्यावर मुरुम टाकण्याऐवजी लालमाती व काळी माती टाकून काम धूमधडाक्यात सुरू आहे. हजारो कोटी रुपये खर्च करुन देखील या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर या कामाचा उपयोग काय ? कामाचा दर्जा असेल तरच काम जास्त काळ टिकेल; पण दर्जाहीन काम केल्याने सर्व पैसे पाण्यात जातील. त्यासाठी चांगल्या प्रकारचा मुरुम वापरुन दर्जात्मक काम होणे अपेक्षित आहे.
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग निकृष्ट दर्जाचे काम चालू असून संबंधित ठेकेदाराचा मनमानी कारभार चालू देणार नाही. मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्षात परिस्थिती दाखवून देणार. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम थांबवले नाही तर संपूर्ण काम बंद पाडणार आहे. - प्रीतम जगदाळे, युवक काँग्रेस अध्यक्ष, फलटण
सध्या आळंदी-पंढरपूर महामार्गाच्या रोडसाठी लाल मातीचा वापर होत असले तर याकडे लोकप्रतिनिधींनी कामाकडे लक्ष केंद्रित करावे. आमच्या वारकऱ्यांच्या भावना एकच की महामार्गाचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे. - बंडातात्या कराडकर, ज्येष्ठ कीर्तनकार