झोपडपट्टी दलाचा अध्यक्ष असल्याचे सांगत चार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:36 AM2021-02-14T04:36:52+5:302021-02-14T04:36:52+5:30
महाबळेश्वर : ‘मी झोपडपट्टी दलाचा अध्यक्ष असल्यामुळे माझी सरकारी कार्यालयात ओळख आहे. मी झोपडी बांधण्याकरिता महाबळेश्वरमध्ये कोठेही जागा मिळवून ...
महाबळेश्वर : ‘मी झोपडपट्टी दलाचा अध्यक्ष असल्यामुळे माझी सरकारी कार्यालयात ओळख आहे. मी झोपडी बांधण्याकरिता महाबळेश्वरमध्ये कोठेही जागा मिळवून देऊ शकतो. वीज जोडणी देतो, झोपडीचा सातबारा उतारा मिळवून देतो,’ असे आश्वासन देत दहाहून अधिक महिलांची ३ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात ऋषिकेश अरुण वायदंडे (रा. महाबळेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत पूनम विशाल चरखे यांनी म्हटले आहे की, ऋषिकेश वायदंडे याने डिसेंबर २०१७ मध्ये ‘मी झोपडपट्टी दलाचा अध्यक्ष असल्यामुळे माझी सरकारी कार्यालयात ओळख आहे. मी तुम्हाला झोपडी बांधण्याकरिता महाबळेश्वरमध्ये कोठेही जागा मिळवून देऊ शकतो,’ असे सांगितले. त्याच्या शब्दावर विश्वास ठेऊन हक्काचे घर मिळेल, या आशेने चरखे यांनी संघटनेची सभासद फी प्रथम तीनशे रुपये भरले. त्यावेळी तेथेच असलेल्या सुशीला पठारे यांनी त्यांच्याकडील वहीमध्ये चरखे यांचे नाव, पती-पत्नीचा फोटो चिकटवून सही घेतली. आधारकार्डची झेरॉक्स दिली परंतु सभासद असल्याचे ओळखपत्र दिले नाही. त्यानंतरही वायदंडे याच्या झोपडीकरिता जागा मिळवून देतो, या शब्दावर विश्वास ठेऊन चार हजार रुपये दिले. वायदंडेने वेळोवेळी झोपडीच्या अनुषंगाने बैठक, वाई, सातारा, पुणे येथे मोर्चा, जयंतीचे कारण सांगून सातशे रुपये रोख असे एकूण पाच हजार रुपये घेतले आहेत. झोपडीसाठी जागा मिळवून देण्याबाबत विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
ऋषिकेश वायदंडे याने महाबळेश्वरमधीलच रेणुका दिलीप साळुंखे, नंदा नारायण भट, जैबुनिसा नूरमोहम्मद जुंद्रे, लीला दत्तात्रय वाडकर, पुष्पा आनंदा चिकणे, कल्पना विश्वास पार्टे, राजश्री राजेंद्र गायकवाड, लक्ष्मी आनंदा ढेबे, जयश्री खंडू वाघमारे, सुशीला भाऊसाहेब पठारे यांनाही झोपडीसाठी जागा मिळवून देतो, असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून ३ लाख ८९ हजार रुपये घेत फसवणूक केली असल्याचे तक्रारदार पूनम चरखे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. वायदंडे आज ना उद्या काम करेल, असे वाटल्याने तक्रार देण्यास उशीर झाल्याचेही चरखे यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी ऋषिकेश वायदंडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे, बाबुराव वरे अधिक तपास करत आहेत.