शेअर्सची अफरातफर करून ७० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 11:36 AM2020-07-03T11:36:45+5:302020-07-03T11:38:02+5:30
डिमॅट अकौंट धारकाच्या बनावट सह्या करून, शेअर अकौंटशी सलग्न मोबाईल क्रमांक बदलून विना संमती सात हजार शेअरची अफरातफर करून एका वद्धाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात शहरातील एका बँकेतील शाखा व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे
सातारा : डिमॅट अकौंट धारकाच्या बनावट सह्या करून, शेअर अकौंटशी सलग्न मोबाईल क्रमांक बदलून विना संमती सात हजार शेअरची अफरातफर करून एका वद्धाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात शहरातील एका बँकेतील शाखा व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
डीमॅट अकौंटचे व्यवहार पाहणारा रोहित शिवाजी शेळके (रा. शेळकेवाडी, ता. सातारा), शाखा व्यवस्थापक, डिमॅट खात्याचे व्यवहार पाहणारे व सहीची शहानिशा करण्याचे अधिकार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांविरूद्ध ही फिर्याद दाखल झाली आहे. याबाबत दत्ता शामराव नरगुंदे (वय ७०, रा. यादोगोपाळ पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
नरगुंदे यांच्या फियार्दीनुसार, १९८० पासून शेअर खरेदी करण्यास नरगुंदे यांनी सुरवात केली. ही खरेदी व विक्री ते ब्रोकर मार्फत करत होते. सुरवातीला त्यांचे व पत्नीचे अशी दोघांची संयुक्त खाती होती. पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी २०१५ साली संयुक्त खाते बंद करून स्वत:च्या खात्यावरून खरेदी सुरू केली. त्यांनी महाराष्ट्र स्कुटर, एशियन पेंटस, ब्ल्यूस्टार, सिप्ला, ग्रासीम, अल्ट्राटेक अशा विविध कंपन्यांचे शेअरर्स खरेदी केले होते.
जून २०१८ मध्ये एनएसडीएलकडून आलेल्या स्टेटमेंटची पाहणी केल्यावर महाराष्ट्र स्कूटर कंपनीचे ८० शेअर्स कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शहरातील एका बँकेत जाऊन डीमॅट अकौंटचे व्यवहार पाहणारे शेळके तसेच शाखा व्यवस्थापकांची भेट घेतली. त्यांनी याची चौकशी करतो, असे सांगितले.
विविध कंपनीचे एकुण सात हजार शेअर्स कमी झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतरही ते शेळके व शाखा व्यवस्थापकाला भेटले. व्यवहार न करता शेअरर्सची विक्री कशी झाली याबाबत नरगुंदे यांनी विचारणा केली.
यावेळी त्यांना प्रिंटींग मिस्टेक असेल, बँकेचे व्हर्जन बदलले आहे, थोडे थांबा, आम्ही चौकशी करतो, अशी कारणे सांगण्यात आली. यानंतर फेब्रुवारी महिन्यात शेळके त्यांच्या घरी गेला होता. शेअर्सची विक्री मीच केली असून यात अफरातफरही मीच केली आहे.
शेअर्सच्या अफरातफरीबाबत कोठेही तक्रार करू नका, आपले पैसे मी सवडीने परत करीन. तक्रार करू नका, असे त्याने सांगितले. परंतु, लेखी मागितल्यावर तसे दिले नाही. तसेच पैसेही दिले नाहीत. त्यामुळे नरगुंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शेळके, बँक व्यवस्थापक, व डिमॅट अकौंटशी संबंधित व्यवहार पाहणाऱ्या सर्वांविरूद्ध फिर्याद दिली.
संशयितांची संख्या वाढणार?
शेअर, खरेदी विक्रीमध्ये पहिल्यांदाच तब्बल ७० लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. हा गुन्हा अत्यंत किचकट असून, यामध्ये आणखी नेमके किती संशयित आरोपी सहभागी असतील, हे तपासअंतीच समोर येणार आहे.