सहलीला नेण्याचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:01+5:302021-08-21T04:45:01+5:30
कोरेगाव : २०१९ साली सिंगापूर-मलेशियाला सहलीला नेण्याचे आमिष दाखवून कोरेगावसह जिल्ह्यातील २८ जणांची ८ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक ...
कोरेगाव : २०१९ साली सिंगापूर-मलेशियाला सहलीला नेण्याचे आमिष दाखवून कोरेगावसह जिल्ह्यातील २८ जणांची ८ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील श्रीकांत विष्णू सोनावणे व ललना श्रीकांत सोनावणे या पती-पत्नीविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विलास शंकर भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
कोरेगावातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या समूहाची श्रीकांत विष्णू सोनावणे व ललना श्रीकांत सोनावणे यांनी ब्ल्यू वर्ल्ड हॉलिडेज कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमार्फत परदेश सहल आयोजित केली होती. दोन्ही समूह सहलीवरून परतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वस्तात परदेशात सहलीचे आयोजन करत असल्याचे सांगत त्यांनी कोरेगावसह जिल्ह्यातील २८ जणांना आमिष दाखविले.
त्यासाठी कोरेगावात त्यांनी वारंवार बैठका घेऊन प्रतिव्यक्ती ६५ हजार रुपयांमध्ये सिंगापूर-मलेशिया येथे सहलीला नेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे ८ लाख ७० हजार रुपये घेतले व त्याचा करारनामा करूनदेखील दिला. दि. १७ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई विमानतळावरून सहलीला जाण्याचे नियोजन असल्याचे सांगत उर्वरित रक्कम घेऊन येण्यास सांगितले. सहलीला निघण्यापूर्वी दहा ते पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी फोनवरून सिंगापूर व मलेशिया येथे भरपूर पाऊस असल्याचे सांगून सहलीला जाता येणार नसल्याचे स्पष्ट केले. १५ दिवसांनी पुन्हा सहलीला जाऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी दोन ते तीनवेळा वायदे दिले आणि बदलत टाळाटाळ केली.
सर्वांनी सहलीसाठी तगादा लावल्यानंतर तुम्हाला सहलीला नेता येणार नाही, आम्ही अडचणीत आहोत, असे कळविले. त्यावर अनामत दिलेली रक्कम परत मागितल्यानंतर त्यांनी धनादेश दिले. धनादेश बँकेत जमा केल्यानंतर खात्यावर रक्कम नसल्याने ते परत आले. त्यामुळे अखेरीस कंटाळून विलास भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीकांत विष्णू सोनावणे व ललना श्रीकांत सोनावणे (रा. क्वार्टर नं. ६ सी, ३, पनवेलकर कॅप्सूल, ल. खा. माने नगर, कोंडुजगाव, अंबरनाथ पश्चिम, जिल्हा ठाणे) यांच्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.