भागीदारीचे आमिष दाखवून फसवणूक; कऱ्हाडच्या चांदी व्यावसायिकाला ९० लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 12:13 PM2024-01-08T12:13:56+5:302024-01-08T12:18:16+5:30
सांगली जिल्ह्यातील सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल
कऱ्हाड : भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांवर शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज विष्णू साळुंखे (रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
नवीनकुमार सावंत व महेशकुमार सावंत (रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडातील मंगळवार पेठेत राहणारे सुरज साळुंखे हे चांदीचा व्यवसाय करतात. व्यवसायानिमित्त ते आंध्र प्रदेशमध्ये गेले असताना त्याठिकाणी त्यांची भिकवडी येथील नवीन सावंत याच्याशी ओळख झाली. त्यानंतर नवीन याने सुरज यांना कऱ्हाडात दुकान सुरू करणार असल्याचे सांगून पैशाची मागणी केली. तसेच भागीदारीत व्यवसाय सुरू करू, असेही सांगितले. त्यामुळे सुरज यांनी याबाबत नवीन याचा भाऊ महेश याच्याशी फोनवरून चर्चा केली.
त्यानंतर सोन्याचे दागिने गहाण ठेवून १५ लाख तसेच स्वत:जवळील १५ लाख असे ३० लाख रुपये सुरज यांनी नवीनला दिले. १६ जानेवारी २०२२ रोजी हा व्यवहार झाला. त्यानंतर महेश व नवीन दोघेही सुरज यांच्या कऱ्हाडातील दुकानात आले. त्यावेळी सुरज यांनी चांदीबाबत विचारणा केली. मात्र, चांदीसाठी आणखी दहा लाख रुपयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सुरज यांनी दहा लाख रुपये दिले. त्याबरोबरच जास्तीत जास्त चांदी आणायची असेल तर आणखी तीस लाख रुपयांची जुळणी कर, असे ते दोघे म्हणाले. त्यामुळे सुरज यांनी त्यांच्या मित्राकडून आणखी तीस लाख रुपये घेऊन नवीन आणि महेश या दोघांना दिले. त्यानंतर आणखी दहा लाख रुपये नवीनच्या बँक खात्यावर भरण्यात आले.
६ सप्टेंबर २०२१ पासून आजअखेर सुरज साळुंखे यांनी नवीन व त्याचा भाऊ महेश या दोघांना एकूण ९० लाख रुपये दिले. मात्र, एवढे पैसे देऊनही त्या दोघांनी सुरज यांना चांदी आणून दिली नाही. तसेच भागीदारीत व्यवसायही सुरू केला नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरज साळुंखे यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.
एक एकर जमिनीचे आश्वासन
नवीन व महेश हे दोघेजण चांदी आणून देत नाहीत. तसेच आपण दिलेले पैसेही परत देत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर सुरज साळुंखे यांनी त्यांच्यामागे पैशासाठी तगादा लावला. त्या दोघांची भेट घेण्यासाठी सुरज भिकवडी येथे त्यांच्या घरी गेले. त्यावेळी दोघांनीही आमच्याकडे पैसे नाहीत. आमच्या नावावर असलेली एक एकर जमीन आम्ही तुझ्या नावावर करून देतो, असे आश्वासन सुरज यांना दिले होते. मात्र, त्या दोघांनी पैसे दिले नाहीत. तसेच जमीनही नावावर करून दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.