पालिकेच्या प्रांगणात विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग पाॅईंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:37+5:302021-02-23T04:57:37+5:30
कराड : स्वच्छ सर्वेक्षण २०२१च्या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेने जनजागृती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगळावेगळा ...
कराड :
स्वच्छ सर्वेक्षण २०२१च्या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेने जनजागृती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉईंट कराड नगरपरिषद परिसरात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१मध्ये गत दोन वर्षाप्रमाणे याही वर्षी देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचा संकल्प कराड पालिकेने केला आहे.
शहरात स्वच्छतेविषयी प्रबोधनपर जनजागृती कार्यक्रम सुरू असून, कराड नगरपरिषदेने "माझी वसुंधरा अभियान"अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि प्रदूषण टाळणे, इंधन बचत व्हावी. यासाठी कराड शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त विद्युत वाहनांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. कराड शहरातील जे नागरिक विद्युत वाहनाचा वापर करतील त्यांना सहज सुलभ विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉईंट सुरू करण्यात आलेला आहे. कराड शहरातील जे नागरिक विद्युत वाहनाचा वापर करीत आहेत, असे विद्युत वाहन चालक मोफत चार्जिंग पॉईंटचा लाभ घेत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण आणि "माझी वसुंधरा"मध्ये पर्यावरण समतोलासाठी विविध उपाययोजना करणेबाबत राज्य शासनाच्या सूचना आहेत. या अनुषंगाने चार्जिंग पॉईंट सुरू केलेला आहे. कराड शहरातील छत्रपती शिवाजी मंडई परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कराड नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१च्या अनुषंगाने ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक बंदी व कोविडच्या अनुषंगाने मास्कचा वापर करणे अशा विविध उपक्रमांबाबत नागरिकांना माहिती देऊन त्यांचा सहभाग नोंदविणेबाबत आवाहन करणेत आले आहे.
फोटो ओळ :कराड नगरपालिकेच्या प्रांगणात विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग पाॅईंट सुरु करण्यात आला असून, वाहनचालक त्याचा लाभ घेत आहेत.
फोटो :22 pramod 01