कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीसह मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:38 AM2021-04-21T04:38:22+5:302021-04-21T04:38:22+5:30
मलकापूर : येथील श्रीमळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. संस्थेने स्वखर्चाने खबरदारीची उपाययोजना म्हणून कोरोना ...
मलकापूर : येथील श्रीमळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. संस्थेने स्वखर्चाने खबरदारीची उपाययोजना म्हणून कोरोना चाचणीसह मोफत आरोग्य तपासणी करून घेतली.
त्याप्रसंगी मळाई ग्रुपचे प्रमुख शेतीमित्र अशोकराव थोरात म्हणाले, ‘सद्य:स्थितीत कोरोनाचे संकट असताना त्यावर मात करण्याची मुक्तपणे लोकांना आर्थिक सेवा सुविधा देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे. मळाई देवी पतसंस्था शासनाचे सर्व आदेश व नियम पाळून चांगले कामकाज करीत आहे. वर्षभर कोरोनाग्रस्तांना आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करून सामाजिक कार्यात अग्रेसर राहिली आहे. कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी आपले शरीर आणि मन मजबूत असायला हवे. उत्तम प्रतिकारशक्ती आणि सकारात्मक मन या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.’
या वेळी डॉ. स्वाती थोरात यांनी सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून तसेच मोफत औषधे वितरित केली. कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात स्वतःची व स्वत:च्या कुटुंबाची कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. पुरेशी झोप व रोज दहा मिनिटे तरी ध्यानधारणा आणि वीस मिनिटे व्यायाम करा. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विटामिन ‘डी’ची गरज आहे. त्यामुळे दररोज कोवळ्या उन्हात उभे राहावे.’
या वेळी मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा अरुणादेवी पाटील, त्यांचे सर्व सहकारी, प्राचार्य एस.वाय. गाडे, कऱ्हाड येथील विज्ञान प्रबोधिनीचे सचिव शेखर शिर्के, सर्जेराव शिंदे उपस्थित होते.