गृहविलगीकरणातील बाधितांचा शहरात मुक्त संचार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:39 AM2021-04-17T04:39:04+5:302021-04-17T04:39:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : मलकापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्य १३०० पार झाली आहे. शहरातील अनेक रुग्ण गृहविलगीकरणात ...

Free movement of homeless people in the city ... | गृहविलगीकरणातील बाधितांचा शहरात मुक्त संचार...

गृहविलगीकरणातील बाधितांचा शहरात मुक्त संचार...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : मलकापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्य १३०० पार झाली आहे. शहरातील अनेक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. मात्र, प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून काही रुग्णांचा शहरात मुक्त संचार सुरू आहे. अशा बेजबाबदारपणामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

मलकापुरात गेल्यावर्षी पहिल्या टप्प्यात २१ एप्रिलला आगाशिवनगरात शहरातील पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. नंतर एका महिन्यात ३१ जण बाधित झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच शहरातील सर्व ३१ रुग्ण बरे झाल्याने शहर कोरोनामुक्त झाले होते. मात्र, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २६ जूनला येथील खंडोबानगरमधे पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला. ऑक्टोबरअखेर चार महिन्यांत दररोज टप्प्या-टप्प्याने कोरोनाचे रुग्ण वाढतच गेले. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत रुग्णवाढीचा वेग मंदावला होता. पण, पूर्णपणे थांबला नव्हता.

फेब्रुवारीनंतर शहरात पुन्हा निर्माण झालेल्या कोरोनाबाधित साखळ्या थांबता थांबत नाहीत. मात्र, यावेळी जास्त संख्येने बाधित होत आहेत. दिवसाला साधारणपणे १५ ते २० रुग्ण सापडत आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गुरुवारपर्यंत शहरात १ हजार ३०० च्या वर रुग्ण स्पष्ट झाले आहेत. त्यापैकी साधारणतः १ हजार १२१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत १३९ रुग्णांपैकी ३९ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर १०० बाधितांना होम आयसोलेशनची सुविधा दिली आहे. अशा रुग्णांसाठी स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभाग वेळोवेळी मार्गदर्शन करत असतानाही प्रशासनाने दिलेले नियम धाब्यावर बसवून त्यापैकी काही रुग्णांचा शहरात मुक्त संचार सुरू आहे. मेडिकल दुकानात औषध खरेदीसह चारचाकी वाहनातून फिरत असल्याचे आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा बेजबाबदारपणामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील नवीनच नागरिक व त्यांचे निकटसहवासित बाधित होत असल्याने शहरात कोरोनाची धास्ती कायम आहे.

चौकट :

कोरोना सेंटरमध्ये ठेवण्याची गरज...

होम आयसोलेट रुग्णांसाठी स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभाग वेळोवेळी मार्गदर्शन करते. असे असतानाही होम आयसोलेशनचे नियम धाब्यावर बसवून त्यापैकी काही रुग्ण शहरात मुक्त संचार करतात. अशा बेजबाबदारपणामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी शहरातील अशा रुग्णांना विविध खासगी कोरोना केअर सेंटर किंवा त्यांना अलगीकरणात ठेवण्याची गरज आहे.

कोट :

कोणत्याही रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मेडिकल व्यावसायिक आपला जीव धोक्यात घालून सेवा देतात. गुरुवारी एक रुग्ण चारचाकी वाहनातून औषधी खरेदीसाठी आला. समोरासमोर बोलत चिठ्ठीतील औषधी दिली. संबंधित औषधी ही कोरोना रुग्णाला देतात ती होती. म्हणून, हे औषधे कोणाचे असे संबंधिताला विचारले असता मीच रुग्ण असल्याचे त्याने सांगितले आणि सर्वांचे धाबेच दणणाले. त्यानंतर पाचच मिनिटांत दुकानाचा परिसर सॕनिटाईज केला. होम आयसोलेट रुग्णांचा बेजबाबदारपणा धोकादायक आहे. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

- हेमंत मोरे, मेडिकल व्यावसायिक

Web Title: Free movement of homeless people in the city ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.