मोफत साखर अन् साखरपेरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:25+5:302021-06-02T04:29:25+5:30

ऊस उत्पादक सभासदाला आपल्या साखर कारखान्यातून सवलतीच्या दराने मर्यादित साखर देण्याची पद्धत जुनीच आहे. जयवंतराव भोसले कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष ...

Free sugar and sugar sowing! | मोफत साखर अन् साखरपेरणी !

मोफत साखर अन् साखरपेरणी !

Next

ऊस उत्पादक सभासदाला आपल्या साखर कारखान्यातून सवलतीच्या दराने मर्यादित साखर देण्याची पद्धत जुनीच आहे. जयवंतराव भोसले कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष असतानाही सभासदांना सवलतीच्या दराने ही साखर दिली जात होती. सन १९९९ पासून पाहिले तर दोन रुपये किलो दराने साखर मिळत आहे. १९८९ साली यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले या दोन भावांच्यात उभा संघर्ष पेटला. रयत व सहकार पॅनेलमध्ये लढत झाली. आणि पहिले ऐतिहासिक सत्तांतर झाले. त्यानंतर मदनराव मोहिते कारखान्याचे अध्यक्ष झाले. पुन्हा डॉ. सुरेश भोसले अध्यक्ष झाले. तरीदेखील सवलतीच्या दरातील साखर सभासदांना दोन रुपये किलो दरानेच मिळत होती.

सन २००५ साली डॉ. इंद्रजित मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. त्यानंतर काही दिवसांतच हीच सवलतीची साखर सभासदांना १४ रुपये किलो दराने मिळू लागली. या दरवाढीबद्दल सभासदांच्यात नाराजी पसरली. नंतर तो दर ७ रुपयांवर आला. मात्र, या दरानेही सभासदांच्यात समाधानाचे वातावरण तयार झालेच नाही. दरवाढीमागे डॉ. मोहिते यांनी तांत्रिक कारणही तेव्हा दिले होते. मात्र, सभासदांना ते तेव्हा रुचले नाही.

दरम्यान, डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकारातून मोहिते-भोसले कुटुंबीयांचे मनोमिलन झाले. सन २००८-०९ च्या निवडणुकीला हे मनोमिलन कृष्णा साखर कारखाना निवडणुकीला सामोरेही गेले. त्या वेळी विंग येथील जाहीर प्रचाराच्या सभेत जयवंतराव भोसले यांनी आपल्या भाषणात सभासदांना सवलतीच्या दरातच काय तर मोफत साखर दिली पाहिजे आणि ते शक्य आहे. ते कारखान्याचे मालक आहेत, असे म्हटले होते. मात्र, तेथे उपस्थित असणाऱ्या डॉ. इंद्रजित मोहितेंना तेव्हा ते पचनी पडले नव्हते. डॉ. मोहितेंना हे जर पचनी पडले असते तर कदाचित त्या वेळी सत्तांतर झाले नसते, असे जाणकार म्हणतात. या निवडणुकीत सत्तांतर झाले. अविनाश मोहिते यांचे पॅनेल सत्तेवर आले. त्या वेळी त्यांनीही दोन रुपये किलो दराने साखर सभासदांना उपलब्ध करून दिली.

त्यानंतर तिरंगी लढतीत सत्तांतर होऊन सहकार पॅनेल सत्तेवर आले. डॉ. सुरेश भोसले कारखान्याचे अध्यक्ष झाले. त्यांनी मात्र २०१६ मध्ये वडिलांची अपेक्षा पूर्ण केली अन् सभासदांना मोफत साखरेची घोषणा केली. तसेच ती अमलातही आणली. गेली पाच वर्षे प्रत्येक सभासदाला प्रतिवर्षी साठ किलो साखर मोफत मिळत आहे. डॉ. सुरेश भोसले यांची कदाचित ही ''साखर पेरणी''च म्हणावी लागेल. त्यामुळेच आज सभासदांच्यात समाधानाचे वातावरण दिसत आहे. सभासदांना मोफत साखर देणारा ''कृष्णा'' हा राज्यातील एकमेव साखर कारखाना आहे.

गत पाच वर्षांत सुमारे ३८ कोटींची साखर सभासदांना मोफत दिली गेली आहे. म्हणूनच डॉ. सुरेश भोसले कृष्णाचा ऊसदर नजीकच्या साखर कारखान्यांपेक्षा जास्त असल्याचा दावा करतात. त्यांच्या मते ऊसदराबरोबरच मोफत साखरही त्यामध्ये गृहीत धरावी. आता त्यांच्या या मोफत साखरेचा गोडवा निवडणुकीत किती कामी येतोय, हे पाहावे लागेल.

- प्रमोद सुकरे, कराड

Web Title: Free sugar and sugar sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.