मालवाहू टेम्पो बनला ‘स्कूल बस’-शासनाकडून निधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:52 PM2019-12-21T23:52:43+5:302019-12-21T23:52:59+5:30
त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक क्रीडा स्पर्धेत भाग घेणा-या विद्यार्थी संख्येवर खासगी जीप, टेम्पोमध्ये खचाखच विद्यार्थ्यांना बसवून धोकादायक स्थितीत स्पर्धेसाठी आणले जातात. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सूर्यकांत निंबाळकर ।
आदर्की : विद्यार्थ्यांना देशाची भावी संपत्ती समजली तर वावगे ठरणार नाही. त्यांची काळजी करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शहरांमध्ये आलिशान स्कूलबस किंवा रिक्षांमधून मुलं शाळेला जातात; पण फलटण तालुक्यात मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोतून मुलांना खेळासाठी नेले जाते आहे. ही वाहतूक विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते.
विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होऊन स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा केंद्र, बीट, तालुकास्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थ्यांना धोकादायक स्थितीत व माल वाहतूक करणाºया छोट्या टेम्पोतून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून शासन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यासाठी केंद्रस्तरीय, बीटस्तरीय, तालुकास्तरावर सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पण केंद्रस्तरावरील स्पर्धा दहा किलोमीटर अंतरावर जेथे माळरान, मैदान उपलब्ध आहे. त्या ठिकाणी स्पर्धांचे आयोजन केले जाते.
बीटस्तरावरील स्पर्धा तीन बिटांतील शाळा एकत्र करून स्पर्धा भरवण्यात येतात. त्या उपलब्घ मैदानावर पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी येतात. त्याप्रमाणे तालुस्तरावर स्पर्धा होतात. त्या ठिकाणी जाण्यासाठी शासन कोणताही निधी देत नाही. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक क्रीडा स्पर्धेत भाग घेणा-या विद्यार्थी संख्येवर खासगी जीप, टेम्पोमध्ये खचाखच विद्यार्थ्यांना बसवून धोकादायक स्थितीत स्पर्धेसाठी आणले जातात. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पाच किलोमीटर आत स्पर्धा हव्यात...
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक टाळण्यासाठी केंद्र्रस्तरीय स्पर्धेसाठी पाच किलोमीटरच्या आत मैदान उपलब्घ करावे. मुख्य रस्त्याजवळ जागा उपलब्घ करावी, शासनाने विद्यार्थी वाहतुकीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
जिल्हा परिषद शाळा स्पर्धेत टिकण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. क्रीडा स्पर्धांना जाण्यासाठी निधी नसल्याने काही शिक्षक आपल्या खासगी कारमधून विद्यार्थ्यांना नेतात; पण मोठ्या शाळेत विद्यार्थी संख्या मोठी असल्याने टेम्पोतून घेऊन जावे लागते. शासन वाहतुकीसाठी निधी देत नाही
- अर्जुन भोईटे, निवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी
ग्रामीण भागात खेळाडू घडावेत, त्यासाठी शिक्षक जादा तास घेतात. पण ग्रामीण भागात मैदाने उपलब्घ नाहीत. केंद्रस्तरावर स्पर्धा होतात. त्यावेळी दहा ते अकरा शाळेचे विद्यार्थी असतात. त्यांना ने-आण करण्यासाठी टेम्पोशिवाय पर्याय नसतो.
- लहुराज मोहिते, मुळीकवाडी, ता. फलटण.