‘जनशक्ती’तील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:38 AM2021-03-05T04:38:36+5:302021-03-05T04:38:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेत सध्या अर्थसंकल्प मंजुरीवरुन कलगी-तुरा चांगलाच रंगला आहे. सत्तेत असणार्या भाजप व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेत सध्या अर्थसंकल्प मंजुरीवरुन कलगी-तुरा चांगलाच रंगला आहे. सत्तेत असणार्या भाजप व जनशक्ती आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु, या सगळ्या घडामोडीत जनशक्तीचे नेते व उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील कोठेही दिसत नसल्याने बहुमताचा दावा करणाऱ्या जनशक्ती आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
पालिकेच्या राजकारणात सत्तेचे त्रांगडे पाहायला मिळत आहे. रोहिणी शिंदे भाजपच्या माध्यमातून थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. परंतु, सभागृहात जनशक्ती आघाडीचे बहुमत आहे. जयवंतराव पाटील हे त्यांचेच उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विचारांची लोकशाही आघाडी विरोधी बाकावर आहे. त्यामुळेच गत चार वर्षात पालिकेत सत्तेची सर्कस कऱ्हाडकरांना पाहायला मिळत आहे.
पालिकेची अर्थसंकल्पीय सभा नुकतीच पार पडली. यावेळी भाजपचे नगरसेवक सुहास जगताप यांनी सूचनेचे वाचन केले तर विरोधी लोकशाही आघाडीच्या सौरभ पाटील यांनी बजेटवर झोड उठवत काही प्रश्न उपस्थित केले. मात्र, त्याला उत्तर कोण देणार? हा प्रश्न निर्माण झाला. ज्यांनी सूचना वाचली त्यांनी उत्तर द्यायला हवे, असा पवित्रा जनशक्तीच्या राजेंद्र यादव यांनी घेतला. पालिकेत सत्ताधारी कोण, असा प्रश्नही जनशक्तीने उपस्थित केला. आमचे बहुमत असल्याने सूचना आम्ही वाचायला हवी पण भाजप चुकीचा पायंडा पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला. आज कऱ्हाडचा अर्थसंकल्प सूचना अन् उपसूचनेच्या गोंधळात कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
भाजपच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे व ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर आदींनी पत्रकार परिषद घेऊन जनशक्तीवर हल्लाबोल केला तर जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला सडेतोड उत्तर दिले. परिणामी कऱ्हाडातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. परंतु, या सगळ्यात जनशक्ती आघाडीचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील कुठेही दिसत नाहीत, याचीही चर्चा शहरभर होत आहे.
वास्तविक अर्थसंकल्पाच्या सभेलाच उपनगराध्यक्ष नव्हते. त्यावेळी ते बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पावसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जनशक्तीवर टीकेची झोड उठवली, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जनशक्ती आघाडीने राजेंद्र यादव यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. मात्र, त्यालाही उपनगराध्यक्ष अनुपस्थित होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी उपनगराध्यक्ष कोठे आहेत? असा प्रश्न विचारला. त्यावर यादव यांनी आज त्यांचा वाढदिवस असल्याचे सांगितले. मग त्यांना शुभेच्छा दिल्या की नाही, असे विचारताच हसत-हसत आमच्या त्यांना नेहमीच शुभेच्छा आहेत? असे यादव म्हणाले. आता यादवांच्या या शुभेच्छा खऱ्या किती आणि कशासाठी आहेत? हा संशोधनाचा भाग आहे.
सध्या पालिकेत जनशक्ती आघाडी बहुमताचा दावा करत असली, तरी उपनगराध्यक्ष पाटील यांच्याबरोबर पाच नगरसेवक आहेत म्हणे! तर जनशक्तीतून निवडून आलेले काहीजण आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानतात. फक्त या सर्वांची तांत्रिक अडचण आहे एवढेच! त्यामुळे आघाडीच्या नावात जरी ‘जनशक्ती’ असले तरी ती शक्ती आज एकसंघ नाही, हे मात्र खरे. ...
चौकट :
स्वतंत्र बसण्याची केली होती मागणी...
जनशक्ती आघाडी अंतर्गत असणारी ही धुसफूस नवीन नाही. सुमारे दीड वर्षांपूर्वी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी पालिका सभेवेळी सभागृहातच माझ्यासह सहा नगरसेवकांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतरही गटनेते राजेंद्र यादव व उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्यातील विसंवाद कायमच राहिल्याचे चित्र आहे.
-------''
फोटो :
4 राजेंद्र यादव 01
4जयवंतराव पाटील 02