दोडामार्ग शहरात वीजपुरवठा खंडित, धरणे आंदोलन छेडू : नानचे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:39 AM2020-06-22T10:39:30+5:302020-06-22T11:02:54+5:30
दोडामार्ग शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत रहावा यासाठी पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास विद्युत विभागाच्या कारभाराविरोधात धरणे आंदोलन छेडू, इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला. त्यावर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांनी दिली.
दोडामार्ग : दोडामार्ग शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत रहावा यासाठी पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास विद्युत विभागाच्या कारभाराविरोधात धरणे आंदोलन छेडू, इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला. त्यावर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांनी दिली.
दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यात पावसाळ्याच्या तोंडावरच वीजप्रवाह वारंवार खंडित होत आहे. याकडे नानचे यांनी लक्ष वेधले. कुडाळ विद्युत कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांची त्यांनी याबाबत भेट घेतली. त्यावेळी चर्चेदरम्यान तालुक्यात चाललेल्या विजेच्या खेळखंडोबाबाबत त्यांनी दिली. यावेळी ग्रामस्थ सुनील म्हावळणकर, फोंडू हडीकर उपस्थित होते.
तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने व्यापारीवर्गाचे नुकसान होत आहे. जंगलभागातून गेलेल्या विद्युत वाहिन्या रस्त्यालगत घालण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय दोडामार्ग तालुक्याचे ठिकाण असल्याने कोणत्याही परिस्थितीत शहराचा विद्युत पुरवठा खंडित होऊ देऊ नका. एखाद्या वेळेस वीज गेल्यास पर्यायी मार्ग म्हणून कोनाळकट्टा येथील महालक्ष्मी विद्युत प्रा. लि. ची वीज जोडून द्या, अशी मागणी केली.
यावेळी कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांनी लॉकडाऊनमुळे पावसाळ्यापूर्वीची दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यास उशीर झाल्याचे मान्य केले. यापुढे दोडामार्ग शहराचा वीज पुरवठा कायम सुरळीत ठेवण्याची काळजी घेतली जाईल. प्रसंगी महालक्ष्मीची वीज जोडून पर्यायी मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिले.
पर्यायी उपाययोजना राबवू : रमेश लोकरे
ाुढील पंधरा दिवसांत दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्यांचा आढावा घेण्यासाठी आपण स्वत: दोडामार्गमध्ये येऊ. त्यावेळेस रस्त्यालगत विद्युत वाहिनी टाकण्याबाबत उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांबाबत चर्चा करू व तशी उपाययोजना राबवू, असे कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांनी नानचे यांना सांगितले.