अख्ख्या लाॅकडाऊनमध्ये खाल्ली ताजी-ताजी भाजी..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:45 AM2021-09-24T04:45:43+5:302021-09-24T04:45:43+5:30
माणसाला कोरोनानं खूप काही शिकवलं. काम, पैशाच्या मागे लागल्याने माणूस आपली माणसं, त्यांची सुख-दु:ख विसरला होता. पोरांच्याही आठ-आठ दिवस ...
माणसाला कोरोनानं खूप काही शिकवलं. काम, पैशाच्या मागे लागल्याने माणूस आपली माणसं, त्यांची सुख-दु:ख विसरला होता. पोरांच्याही आठ-आठ दिवस भेटीगाठी होत नव्हत्या. पण याचं कोणालाच विशेष वाटत नव्हतं. कामाच्या व्यापात माणूस आवडी, छंदही हरवून बसला होता. याच माणसाला जमिनीवर आणण्याचे काम कोरोनाने केले.
कोरोनाचा शिरकाव भारतात मार्च २०२० मध्ये झाला. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाविषयी प्रशासन, आरोग्य विभागालाही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे कडकडीत संचारबंदी लागू केली होती. शहरातील प्रमुख रस्ते बॅरिकेट, कळक (बांबू) लावून बंद केले होते; तर काही गावांमध्ये येणाऱ्या रस्त्यावर चर खोदून, काटे टाकून कोणी येणार नाही, याची खबरदारी घेतली जात होती. शहरात कोणी रस्त्यावर फिरताना दिसला, तर पोलीस बदडून काढत होते. त्यामुळेच माणसांना घरातच थांबावे लागत होते. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने पुढे दारापर्यंत फळे, भाजी विक्रेते येतील याचे नियोजन केले.
काहीवेळेस आठ-आठ दिवस बाहेर पडता येत नव्हते. तेव्हा कडधान्यापासून भाजी करून गृहिणींनी वेळ निभावून नेली. पण मूळचे शेतकरी असलेले, गावाकडे बालपण गेलेल्यांनी रिकाम्या वेळेत अंगणात, टेरेसवर, तर काहींनी बाल्कनीत भाज्या पिकविण्याचा निर्णय घेतला. यासाठी ओळखीच्या लोकांकडून रात्रीच्यावेळी रोपं, बियाणं, तर काही वेळेस खतं आणून जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकवली. या काळात कंपन्या, शासकीय, निमशासकीय कार्यालये बंदच होती. त्यामुळे कामही फारसे नसल्याने अनेकांकडे वेळच वेळ होता. या वेळेत त्यांनी पाणी वेळेवर देणे, गवत काढणे असली कामे केली. त्यामुळे या भाज्याही चांगल्या उगवल्या. काही महिन्यात त्याची भाजी करता येईल एवढी वाढ झाली.
यातून स्वनिर्मितीचा आनंद घेता आला. ग्रामीण भागात किंवा शहरातही ज्यांच्या दारात जागा मोठी आहे, त्यांनी झाडवर्गातील शेंगभाजीची लागवड केली. यामध्ये शेवगा लावला. ज्यांनी अगोदरच हे झाड लावलेले होतं, ते या काळात एकमेकांना मदतीला धावून आले. शेजारधर्म निभावत ते आठ दिवसाला वेगवेगळ्या शेजाऱ्यांना एक-दोन भाज्या होतील एवढ्या शेंगा देत होते.
शहरातील माणसांनी मात्र या काळात कल्पकतेला दाद देत शेतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शहरात वन बीएचके, टू-बीएचके जागेत राहणाऱ्या सिमेंटच्या जंगलातील माणसांकडे कोठून आले अंगण. त्यांनी टेरेसवर, तर काहींनी बाल्कनीत भाज्या पिकवल्या. लाॅकडाऊन काळातही सुरुवातीस सायंकाळच्या वेळेस असंख्य सातारकर फिरायला महादरे, कुरणेश्वर परिसरात जात होते. जाताना रिकाम्या पिशव्या किंवा पोते घेऊन जात होते. येताना शेतातील काळी माती आणत होते.