मैत्री निभावली..पण प्राण गमविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:15 AM2017-09-18T01:15:38+5:302017-09-18T01:15:38+5:30

Friendship is neutral ... but the life is lost! | मैत्री निभावली..पण प्राण गमविला!

मैत्री निभावली..पण प्राण गमविला!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत कन्येला सहभागी करण्यात मित्राने मदत केली होती. याच मदतीची जाणीव ठेवून सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक गाडे हे स्वत:ची मुलगी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी नसतानाही मित्र अ‍ॅड. नितीन माने यांच्या सोबत नागपूरला गेले. परंतु नियतीला हे मान्य नसावे. त्यामुळेच अ‍ॅड. दीपक गाडे यांना नियतीने हिरावून नेले.
दीपक गाडे हे मूळचे फलटण तालुक्यातील तरडगावचे. सातारा जिल्हा न्यायालयात त्यांनी १९९९ पासून वकिली व्यवसायास सुरुवात केली होती. त्यांच्या वकिलीच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत अनेक दिवाणी व फौजदारी खटले त्यांनी यशस्वीपणे चालविले. अ‍ॅड. दीपक गाडे हे वकिलांमध्ये लोकप्रिय व सदा हसतमुख होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांची सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, या मागणीसाठी राबवलेल्या आंदोलनात गाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांची थोरली कन्या उत्कर्षा जलतरणमधील राष्ट्रीय खेळाडू असून, धाकटी कन्या सिद्धी ही बॉक्सिंगपटू आहे. तर पत्नी उमा शिक्षिका आहेत.
अ‍ॅड. नितीन माने व दीपक गाडे हे मित्र होते. माने यांचा मुलगा ओम हा सुद्धा जलतरण खेळाडू आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी चेन्नई येथे स्पर्धा झाल्या. त्यावेळी अ‍ॅड. माने यांच्यासोबत त्यांची मुलगी उत्कर्षा चेन्नईला गेली होती. त्यावेळी अ‍ॅड. गाडे यांना काहीकारणास्तव जाता आले नाही. यंदा दहावीचे वर्ष असल्याने नागपूर येथे होणाºया स्पर्धेमध्ये गाडे यांची मुलगी सहभागी झाली नव्हती. मात्र, अ‍ॅड. माने यांचा मुलगा सहभागी झाला होता. आपल्या अनुपस्थितीत चेन्नईला मुलीला नेल्याची जाणीव ठेवून दीपक गाडे हे आपल्या मित्रासोबत शनिवारी दुपारी साताºयाहून कारने नागपूरला निघाले. अपघात झाला त्यावेळी अ‍ॅड. माने कार चालवित होते तर त्यांच्या शेजारी गाडे हे बसले होते. माने यांच्या पाठीमागे त्यांचा मुलगा तर त्याच्या शेजारी अथर्व शिंदे बसला होता. डाव्या बाजूने कार पुलाला जोरदार धडकल्याने गाडे आणि अर्थवचा जागीच मृत्यू झाला. तरडगाव (चाळशी मळा) येथे अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.
न्यायाधीशांचा कार्यक्रम रद्द
जिल्हा न्यायालयामध्ये रविवारी भंडाºयाचे जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख हे येणार होते. न्यायाधीश होणाºया वकिलांना ते मार्गदर्शन करणार होते. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारीही झाली होती. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक गाडे यांच्या अपघाताची बातमी साताºयात थडकली. जिल्हा बार असोसिएशन शोकसागरात बुडाला. त्यानंतर दिवसभरात होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
बाराव्या वर्षी अथर्वने खाडी पार केली
अर्थव शिंदेने बाराव्या वर्षी गेट वे आॅफ इंडिया अरबी समुद्राची ३५ किलोमीटरची खाडी पोहून पार केली होती. पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्येही तो उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून ओळखला जात होता. विविध राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. रोज पाच तास तो पोहण्याचा सराव करत होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे जावळी तालुक्यातील हुमगाव येथे शोककळा पसरली आहे. त्याने स्पर्धेमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Web Title: Friendship is neutral ... but the life is lost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.