माढ्यामध्ये ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 11:22 PM2019-03-03T23:22:49+5:302019-03-03T23:23:06+5:30

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचे विरोधक असणाऱ्यांची चौथी बैठक शनिवारी रात्री आमदार जयकुमार गोरे ...

'This friendship will not break' in the mud | माढ्यामध्ये ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’

माढ्यामध्ये ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’

Next

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचे विरोधक असणाऱ्यांची चौथी बैठक शनिवारी रात्री आमदार जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडीतील निवासस्थानी पार पडली. यामध्ये प्रत्येकाने आपापल्या अडचणी व पुढील विधानसभेचे गणित मांडले. यातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत किंवा विरोध करायचा; पण तो एकमताने, असे ठरल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
माढा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना विरोध होत असल्याने त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच निवडणूक लढविण्याचे सूचविले. तसेच पक्षाच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही पवार यांना पुन्हा माढ्याचे नेतृत्व करण्याविषयी विनंती केली. त्यावेळी कुठे पवार राजी झाले; पण २००९ मधील स्थिती सध्या नाही. माढ्यात राष्ट्रवादीबरोबरच पवारांबद्दल रोष वाढत आहे. ‘माढ्याची बारामती करू,’ असे वक्तव्य पवारांनी दहा वर्षांपूर्वी केले होते. आता मात्र ते यावरून घुमजाव करत आहेत. त्यातच मतदारसंघात भरीव अशी कामे झाली नाहीत. त्यामुळे मतदार सत्ताधाऱ्यांवर नाराज असल्याचे चित्र आहे. अशा गोष्टींवरून राष्ट्रवादीसाठी माढा सुरक्षित आहे, हे म्हणणे अवघड ठरू लागले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी आणि खासदार मोहिते-पाटील यांचे विरोधक सतत बैठका घेऊ लागले आहेत. या विरोधकांची चौथी बैठक शनिवारी रात्री आमदार गोरे यांच्या माणमधील बोराटवाडीतील निवासस्थानी पार पडली.
आमदार जयकुमार गोरे, काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, धनगर समाजाचे नेते व माळशिरसमधील शेतकरी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष उत्तमराव जानकर, आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेशपंत परिचारक हे या बैठकीला होते. या सर्वांची ही बैठक रात्री उशिरापर्यंत रंगली. यामध्ये सर्वांनाच राष्ट्रवादी नको आहे; पण शरद पवार हे माढ्यातून उमेदवार असल्यास काय करायचे ? यावर बराच खल झाला.
शरद पवार निवडणुकीत असल्यास सर्वांनीच मनापासून मदत करायची किंवा नाहीतर विरोध, यावर सर्वांचा सूर जुळला; पण येणारी परिस्थिती कशी असेल, ते पाहूनच निर्णय घेऊ, असेही यातून समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या सर्व विरोधकांनी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’, असे सांगतच बैठक आटोपती घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजल्याशिवाय राहणार नाही.

शरद पवारांनी माघार घेतली तर...
संजय शिंदे हे भाजपच्या मदतीवर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत ते करमाळ्यामधून लढले; पण त्यांची डाळ शिजली नाही. आता पुन्हा ते करमाळ्यातून निवडणूक लढवू इच्छितात; पण लोकसभेला राष्ट्रवादीला मदत करायची व विधानसभेला काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यातच खासदार मोहिते-पाटील विरोधक म्हणूनही ते ओळखले जातात. जानकर आणि प्रकाश पाटील यांचेही मोहिते यांच्याशी हाडवैर आहे. शरद पवार यांच्याबद्दल मतदारसंघात विरोधी वातावरण आहे. कदाचित पवार हे माघार घेऊन मोहिते-पाटील यांना पुन्हा निवडणूक रिंगणात आणतील. म्हणून तरी सोलापूर जिल्ह्यातील या नेत्यांचा दबावगट करून आटापिटा तर नाही ना, अशाही शंकेला वाव मिळत आहे.
पंढरपुरातही सर्वजण एकत्र; आठ दिवसांनंतर बैठक
पंढरपूरमध्ये १८ फेब्रुवारीला आमदार प्रशांत परिचारक यांच्या येथे या सर्व मित्रांची बैठक झाली होती. तेव्हा रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी वाढदिवसाचं निमित्त असलंतरी माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच सर्व चर्चा झाली. आता बोराटवाडीची बैठक झाल्यानंतर आठ-दहा दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यामध्ये अंतिमत: काय करायचे, यावर एकदाचा काय तो निर्णय घेऊ, असेही बोराटवाडीच्या बैठकीत ठरल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

Web Title: 'This friendship will not break' in the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.